लोकमत न्यूज नेटवर्क
कोळकी : कोरोनाबाधित मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्याने फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराने स्मशानभूमीतील धगधग वाढू लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
फलटण तालुक्यातील कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर कोळकी हद्दीतील महाड-पंढरपूर पालखी महामार्गालगत स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार नगरपालिकेचे कर्मचारी करत असतात. या स्मशानभूमीत रोज एक-दोन बाधित व्यक्तीवर अंत्यसस्कार केले जातात; पण आज चक्क स्मशानभूमीवर जागाच शिल्लक नसल्याने बाजूला पाच जणांवर अंत्यसस्कार करण्यात आले, तर अजून एकासाठी सरपण लावून अंत्यसस्काराची तजबीज चाललेली दिसली. त्यामुळे फलटणसह तालुक्यातील लोकांची चिंता वाढली असून, स्मशानभूमीची धगधग कमी होण्याची मार्ग दिसेना झाला आहे. भविष्यात दिवसेंदिवस अशीच वाढ होत राहिली तर पुणे-मुंबईसारख्या मोठ-मोठ्या शहरात आज अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने दोन-तीन दिवस विलंब होत असून, वाट पाहत बसावे लागत आहे, अशी अवस्था फलटणकरांची होऊ नये,यासाठी प्रशासन त्यांचे काम करीत आहे. नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करून कामाशिवाय बाहेर न पडता घरी थांबून ही लाट आटोक्यात आणणे गरजेचे आहे.
(चौकट)
आतापर्यंत पाचशे ते सहाशे जणांवर अत्यंसस्कार..
कोळकी येथील स्मशानभूमी ही दहीवडी-फलटण-खंडाळा तालुक्यांतील कोरोना बाधित मृत व्यक्तींसाठी प्रशासनाने घोषित केली असून, आतापर्यंत या स्मशानभूमीत चारशे ते पाचशे जणांवर अत्यंसंस्कार प्रशासनाने करण्यात आले आहेत. आता फक्त फलटण तालुक्यातील कोरोना बाधित मृत व्यक्तींवर अंत्यसस्कार केले जात असून, फलटण तालुक्याचे प्रमाण वाढले आहे. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत आहे तर या ठिकाणी रात्रीच्यावेळी लाईट नसल्याने अंधारातच विधी उरकावा लागते, तरी प्रांताधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन संबधित कोळकी ग्रामपंचायतीस सूचना देऊन या ठिकाणी लागणाऱ्या सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी नागरिकांमधून मत व्यक्त होत आहे.
(चौकट)
बाधितांचा मुक्त संचार..
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे चित्र भीतीदायक असून, यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले असून, अशा परिस्थितीमध्ये अनेकजण शासनाने घालून दिलेले नियम पाळताना दिसून येत नाहीत तर जे बाधित आहेत व जे गृहविलगीकरणमध्ये आहेत असे काहीजण बिनदिक्कत फिरत आहेत, हे चित्र फार भीतीदायक आहे. शासकीय नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तृव्य आहे. बाधित व्यक्ती किंवा विलगीकरणमध्ये असणारी व्यक्ती फिरत असतील, अशा लोकांची नावे जागृत नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनास कळविणे आवश्यक असून, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशासनाने गोपनीय ठेवून अशा फिरणाऱ्यांवर व्यक्तीवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारणे आवश्यक आहे.
१८कोळकी
फोटो : कोळकी हद्दीतील राऊरामोशी पुलानजीक कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला जागा अपुरी पडत असल्याचे भयावय असे दृश्य. (छाया
: सतीश कर्वे)