कोळकी : ‘फलटणमधील पोलिस यंत्रणा राहिली नसून कोणाचे कार्यकर्ते बनले आहेत. येथील राजकीय संस्कृती बिघडत दहशतीची बनत चालली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळेच धरणांची कामे मार्गी लागली. फलटणमधील दहशतीचे संस्कृती थोपवण्यासाठी निर्णय घ्यावा लागला,’ अशा भावना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.कोळकी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, दतोपंत शिंदे, कुंडलिक नाळे, सचिन रणवरे, सरपंच स्वप्ना कोरडे, उपसरपंच विकास नाळे, शिवाजी भुजबळ, बबलू निंबाळकर, अशोक कामटे, बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड, ग्रामविकास अधिकारी रमेश साळुंखे उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘फलटणमधील दहशतीला प्रशासन, पोलिस, महसूल, तलाठी सर्वच यंत्रणा पाठीशी घालत आहेत. कोळकीत काय चालतय यावर बारीक लक्ष असून दहशत कोण करतय याची माहिती आहे. सत्तेत आपणही आहे त्यामुळे नागरिकांनी निश्चित रहावे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीला आघाडी टिकत नाही. आपले शत्रू ओळखून लढायचे. कोळकीचा भविष्याचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे. पैसे कसे आणायच मला चांगले माहिती आहे. तीस वर्षांच्या राजकारणात कोळकीचा वाटा मोलाचा आहे. ग्रामपंचायत सदस्य एका विचाराने काम केल्यास गावचा विकास मार्गी लागतो हे कोळकी ग्रामपंचायत दाखवून दिले.’आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचेही भाषण झाले. सरपंच स्वप्ना कोरडे, रेश्मा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच विकास नाळे यांनी स्वागत केले. अक्षय गायकवाड यांनी आभार मानले.
शरद पवारांचे अनंत उपकार, पण..; रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे सांगितलं कारण
By दीपक शिंदे | Published: October 30, 2023 6:10 PM