लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणूचं संकट असून, त्यातच विविध साहित्य, गॅस, इंधनाचे दर वाढल्याने महागाईने कळस गाठला आहे. यामुळे सामान्यांचे जगणे महाग झाले असून, किराणा मालाची यादी महिन्याला दीड हजाराने वाढली आहे. परिणामी घरातील बजेट कोलमडले आहे.
कोरोनाचं संकट आल्यापासून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यातच महागाईचे संकटही गहिरे होत चालले आहे. खाद्यतेलाचा भडका उडालाय. खाद्यतेलाचा एक लिटरचा पाऊच घ्यायचा झाला, तर १५० रुपयांच्या पुढे आहे. डाळीही भाव खात आहेत. त्यातच दिवसेंदिवस गॅस सिलिंडरचा दर वाढतच चालला आहे. सिलिंडर टाकी १ हजाराजवळ पोहोचलीय. त्यामुळे सामान्यांना या महागाईच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. कुटुंबाचा खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
..................................
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च असा
वस्तू वाढलेला खर्च (रुपयात)
खाद्यतेल १६०
धान्य २००
शेंगदाणे ५०
साखर ३५
साबूदाणा ३०
चहापूड २०
डाळ ८०
गॅस सिलिंडर १००
पेट्रोल ३००
इतर ५००
एकूण १४७५
......................................