सातारा : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच शेतकऱ्यांनाही फटका बसला. आता तर इंधन दर वाढल्याने व इतर कारणाने खताचा भाव १५० ते २५० रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच यंत्राद्वारे मशागतीचा खर्चही वधारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
सातारा जिल्ह्यात इंधनाचे दर वाढत चालले आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी ९० रुपयांपर्यंत पेट्रोल तर ८० पर्यंत एक लिटर डिझेल मिळायचे. पण, सध्यस्थितीत इंधनाचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोलचा भाव ९८ ते ९९ तर डिझेलचा एक लिटरचा भाव ९० रुपयांच्या घरात पोहोचलाय. या इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शेतमाल असो किंवा यंत्राच्या सहायाने शेतीची कामे यांचे दर वाढले आहेत. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या खताचेही दर वाढले आहेत. मागील काही दिवसांत १५० ते २५० रुपयांपर्यंत पोत्यामागे (५० किलो) दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच बसत आहे. तसेच दुसरीकडे यंत्राद्वारे मशागती, पेरणी आणि काढणीचा खर्चही वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतच चालला आहे.
........
डीएपीचे दर आधीचे दर आताचे दर
१० २६ २६ १२२५ १४००
१९ १९ १९ १२८५ १५००
१२ ३२ १६ १२३५ १४१०
२४ २४ ० १३३० १५००
........................................................
इंधन दरवाढीचा परिणाम...
इंधन दरवाढीचा परिणाम शेती तसेच वाहतुकीवरही झाला आहे. शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जायचा झाला तरी वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे बाजारात मालाला चांगला भाव आला तरच शेतकऱ्यांच्या हातात काही पैसे येतात. पण, दुसरीकडे शेतीशी निगडित अनेक वस्तू, खते, मशागतींचा खर्च वाढत चाललाय.
.........................................................
मशागत महागली...
जिल्ह्यातील शेती अधिक करुन यंत्राद्वारे करण्यात येते. मशागत, पेरणी आणि काढणी करायची झाली तरी यंत्राचाच अधिक वापर होतो. आता इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले आहेत. पूर्वी नांगरणीचा दर १८०० रुपये एकर होता. आता तो २६०० ते २८०० पर्यंत पोहोचलाय. फणपाळीचा दर ८०० होता. आता १ हजारांवर गेला आहे. चार फुटी सरीचा दर १२०० होता. इंधन दरवाढ झाल्यानंतर याचा भाव २ हजार रुपयांवर पोहोचलाय. तसेच वाहतूक आणि शेतीसंबंधी इतर खर्चातही वाढ झाली आहे.
.........................
कोट :
दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे शेतीवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतमाल वाहतूक आणि शेती मशागतीचे दरही वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे.
- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी
.......................................................
कोरोना पूर्वी डिझेलचा दर कमी होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून इंधन दर वाढत चालला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीच्या दरातही वाढ झालेली आहे. परिणामी एकरी दीड हजार तरी अधिक खर्च करावा लागत आहे.
- संजय कदम, शेतकरी
.................................................
शेती केली तर फायद्याची आहे. पण, निसर्गाची साथही महत्त्वाची ठरते. त्यातच आता डिझेलचा दर वाढला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणपाळी व इतर कामे करायची झाली तर एकरी किमान हजार रुपये तरी जादा लागणार आहेत.
- जगन्नाथ यादव, शेतकरी
.............................................................