लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना विषाणूचं संकट आल्यापासून महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कारण, वर्षभरात पेट्रोल लिटरला सरासरी २१, तर खाद्यतेल ५० रुपयांनी वाढलंय. त्याचबरोबर सिलिंडर, बांधकाम साहित्य दराची घोडदौड सुरूच आहे. कोरोनामुळे एकीकडे रोजगार कमी झाला, हातावर पोट असणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले; पण दुसरीकडे मात्र महागाईने पाय पसरल्याचे दिसून येत आहे.
देशात मागील एक वर्षाहून अधिक काळापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. या संकटाने कोणालाही सोडलेले नाही. सातारा जिल्ह्यात तर सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. या कोरोनाचा सर्वच घटकांना फटका बसला आहे. व्यवसायांवर परिणाम झाला, सामान्यांची कामं बंद पडली, छोट्या विक्रेत्यांना तर दुकानांना टाळं लावावं लागलं. त्यातच इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. यामुळे महागाई आगीत तेल ओतण्याचेच काम करत आहे. त्याचबरोबर कोरोना संकटाचा आयात-निर्यातीवर परिणाम झालाय. यामुळे पाश्चात्त्य देशांनी कर वाढविल्याने खाद्यतेलालाही महागाईची फोडणी बसलीय. त्यामुळे सामान्यांच्या घरात महागाईचंच बोलणं उरलंय.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात पेट्रोलचा लिटरचा दर ७७.९५ पैसे होता, तर आता पेट्रोलला ९९ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गतवर्षी डिझेलला लिटरला ६६.८४ दर होता. आता ९० रुपये लिटरवर पोहोचले आहे. यावरून अवघ्या वर्षभरात पेट्रोल २१, तर डिझेलमागे सरासरी २३ रुपये वाढ झाली आहे. या इंधनवाढीवरही महागाईचं गणित बहुतांशी अवलंबून आहे. कारण, आज यंत्राच्या साहाय्यानं शेतीची कामं करायची झाली तर एकरी खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्याचबरोबर शेतमाल बाजारपेठेत घेऊन जायचं झालं तरी भाड्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ दूर आहेत.
खाद्यतेलामुळे तर महागाईला कडकच फोडणी मिळालीय. कारण, वर्षभरापूर्वी खाद्यतेलाच्या लिटरच्या पिशवीचा दर ८० ते १०० रुपयांदरम्यान होता. आता तो १८० पर्यंत पोहोचलाय. शेंगदाणा, सूर्यफूल तेलाला लिटरला १७० ते १८० मोजावे लागत आहेत, तर सोयाबीन तेलाचा दर १४५ पर्यंत पोहोचलाय. याला कारण म्हणजे देशात ७० टक्के तेल आयात होते. पाश्चात्तय देशांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढवलाय. यामुळे सहा महिन्यांपासून खाद्यतेल महागच होत चाललंय.
घराचं बांधकाम करायचं झालं तर बजेटमध्ये दररोज वाढच होत चाललीय. कारण, स्टील, सिमेंट, वाळू यांचे दर गगनाला भिडू लागलेत. सध्या स्टील ५५ हजार रुपये टन आहे, जे सात महिन्यांपूर्वी ४३ हजारांपर्यंत होते. त्याचबरोबर सिमेंटच्या पोत्याचा दर ३९० पर्यंत पोहोचलाय. वाळू तर मिळेनाशी झालीय. गेल्यावर्षीपर्यंत ४ ते ५ हजारांपर्यंत वाळूला ब्रासला भाव होता. आता चांगल्या वाळूचा दर ८ ते १० हजारांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे बांधकामं करायची झाली तर वाढत्या दराला तोंड द्यावं लागतंय. कारण, बांधकाम साहित्य दरात १५ ते २० टक्के वाढ आहे.
कोरोनामुळे कामं बंद पडत आहेत. सामान्यांना घरात बसून दिवस ढकलावे लागतात. पोलिसांच्या भीतीने हातगाडीधारक गल्लीबोळात जाऊन साहित्य विक्री करत जगण्याची धडपड करत आहेत. अशा काळात महागाई हातपाय अधिकच पसरू लागली आहे.
चौकट :
सिलिंडरमागे २२५ रुपये
वाढविले; १० केले कमी..
सामान्यांचा किचनशी फार मोठा संबंध. किचनशी संबंधित गोष्टी आटोक्यात तर सामान्यांना ‘अच्छे दिन’. यामध्ये सिलिंडर टाकी महत्त्वपूर्ण ठरते; पण गेल्या वर्षभराचा विचार करता सिलिंडर टाकीचा दर जवळपास २२५ रुपयांनी वाढला आहे. यामध्ये फक्त एकदाच तेही दीड महिन्यांपूर्वी १० रुपये कमी केले होते. सध्या टाकी ८२० रुपयांच्या पुढे आहे.
................
कोट :
भारतात गेल्या सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढू लागले आहेत. याला कारण म्हणजे देशात ७० टक्के खाद्यतेल आयात होते. पाश्चात्त्य देशांनी कोरोनामुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निर्यात कर वाढविला. त्यामुळे आपल्याकडे महागाई दिसून येत आहे. यापुढेही खाद्यतेलाच्या दरात तेजीच राहणार आहे.
- संभाजी अगुंडे, खाद्यतेल विक्री प्रतिनिधी
.........................
घराचं बांधकाम करायचं आहे; पण सध्या वाळू मिळेनाशी झाली आहे. जो देणार आहे तोही एका ब्रासला ६ हजार रुपये मागतोय. त्यातच इतर बांधकाम साहित्याचं दरही वाढले आहेत. त्यामुळे नवीन बांधकाम करणं महागच होत चाललंय.
- प्रल्हाद आटपाडकर
...............................................................................