सातारा : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे.याबाबत माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी मंगळवारी रात्री उंब्रजमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी दरोडा टाकला. यामध्ये बाजारपेठतील उद्योजक मुल्ला कुटुंबीयांच्या बंगल्यात मागील बाजूने दरोडेखोर आत शिरले होते. चोरी करताना जैनुबी करीम मुल्ला (वय ८६) या जाग्या झाल्याने दरोडेखोरांनी तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. याठिकाणी ३० तोळे सोने लुटून दरोडेखोर पुढे पांडुरंग कुंभार यांच्या घरी गेले.
या ठिकाणी सुमारे पाच तोळे सोन्यांचे दागिने तसेच दहा हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. त्याचबरोबर अन्य तीन ठिकाणीही या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दरोडेखोरांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे गावालगत असलेल्या इडली कामत हॉटेलमध्येही पहाटेच्या सुमारास चोरी केली.
ही घटना समजल्यानंतर रात्रीच्या सुमारासच पोलिस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तर सकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथक आले होते. त्यांच्याकडून तपास सुरू होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.
ही टोळी सातारा जिल्बाहेरील असून, प्रत्येकजण किमान सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरीवेळी दरोडेखोरांनी टेम्पोचा वापर केला होता. या दरोड्यातील चौघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.