कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरुस्ती करीत असताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडल्याने जनमित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमीवर कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंद्रजित थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे जखमी जनमित्राचे नाव आहे.
कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील सबस्टेशन अंतर्गत असलेल्या आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाइनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि लाइनमन हे तिघे जण आणे येथे गेले होते. या वेळी कोळेवाडी येथून आलेला विद्युत पुरवठा रोहित्र बंद करून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर खांबावरील बिघाड दुरुस्तीसाठी इंद्रजित खांबावर चढला. मात्र तांबवे येथील सबस्टेशनवरून या लाइनला वीजपुरवठा सुरू असल्यामुळे काही सेकंदात विजेचा जबर धक्का त्याला लागला. यामध्येच खांबावरून तो खाली कोसळला. यात गंभीर जखमी झालेल्या इंद्रजितला सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
चौकट :
रिंगफिडिंगमुळे फटका
वीज बिघाड दुरुस्तीसाठी इंद्रजित ज्या खांबावर चढला होता त्या खांबावर रिंगफिडिंग होते. परिणामी, कोळेवाडी सबस्टेशनवरून आलेला विद्युत पुरवठा खंडित केला असला तरी तांबवे सबस्टेशनवरून आलेला उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरू होता. या ठिकाणी काही वर्षे विद्युत बिघाड झाला नसल्यामुळे व या भागात नवीन कर्मचारी असल्यामुळे रिंगफिडिंग असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे हा अपघात घडला.
चौकट :
कोळेवाडी सबस्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावांत गावठाण आणि शेती पंपाना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाइन वेगवेगळ्या आहेत. गावठाणाला विद्युत पुरवठा करणारी कमी दाबाची सिंगल फेज लाइन आहे. तर शेती पंपासह मोठ्या उद्योजकांना उच्च दाबाच्या थ्रीफेज लाइनद्वारे वीजपुरवठा केला जातो.