वाई : शहरातील पीआर चौकात विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने जखमी झालेल्या वानराला वाईतील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले.याबाबत अधिक माहिती अशी की, पीआर चौकातून महावितरण विभागाची मुख्य वाहिनी गेली आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या वानरांच्या कळपातील एका वानराचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. शॉक लागल्याने वानर गंभीर जखमी होऊन खाली जमिनीवर कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी धनंजय मलटनी यांनी प्राणिमित्र अजिज शेख, शाहरुख पटेल व डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांना बोलावून घेतले. यानंतर वाई तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील देशपांडे यांच्या मदतीने जखमी वानरावर तातडीने उपचार करून त्याला वनाधिकारी महेश झांजुर्णे यांच्या ताब्यात दिले.प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर वानराला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आले. वाई तालुक्यातील प्राणीमित्रांमुळे अनेक वन्यप्राण्यांसह पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे.
पीआर चौकासह अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत तारा झाडांना टेकल्या आहेत. त्यामुळेच असे वन्यप्राणी या पक्षी विजेचा शॉक लागून जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा धोकादायक तारांचा व फांद्यांचा अडथळा तातडीने दूर करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.