कोयनानगर : प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळवाकला कोरोनाचा लसीचा पुरवठा करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत तहसीलदार योगेश टोम्पे यांना निवेदन दिले आहे.
पाटण तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकसंख्या व लसीस पात्र लाभार्थी याची आकडेवारी पाहता, प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळवाकला लसी पुरवठा कमी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक गावात अद्याप लसीकरण होऊ शकले नाही. हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र घाटमाथ्यापासून पाटण शहरापर्यंत आहे. यामध्ये बहुतांशी दुर्गम डोंगरी भागाचा समावेश आहे. २५ हजार लोकसंख्येच्या आरोग्य केंद्राच्या हद्दीत ४५ वयापुढील सुमारे बारा हजार लाभार्थी आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असताना, वैद्यकीय अधिकारी व उपलब्ध कर्मचारी कोरोना काळात स्वतःचा, कुटुंबांचा व वेळेचा विचार न करता दिवस-रात्र सेवेत आहेत. मात्र अपुरा लस पुरवठा होत असल्याने अनेकजण वंचित आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्यातील लस वितरणाबाबत कोणते निकष लावलेत, हे स्पष्ट करून तसेच हेळवाकला आवश्यक लसीचा पुरवठा करावा अन्यथा दि. २० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळवाक येथे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
निवेदनावर नंदकुमार सुर्वे, दयानंद नलवडे, सचिन कदम, विलास कदम, भरत कुराडे, समर्थ चव्हाण यांच्या सह्या आहेत.