सातारा : सातारा जिल्हा कारागृहात बंदीकडूनच पोलिसाला मारहाण करुन शिवीगाळची घटना घडली. तसेच पोलिसाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी कारागृहातील पोलीस रणजित गोपीचंद बर्गे (वय ४०, रा. मोळाचा ओढा, सातारा. मूळ रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर बंदी काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (वय ३७, रा. आंधळी, ता. माण) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. जिल्हा कारागृहात सर्कल क्रमांक दोनच्या समोरील मोकळ्या जागेत आणि अधीक्षक कार्यालयात हा प्रकार झाला. संशयिताने विनाकारण पोलीस रणजित बर्गे यांना मागून येऊन तुला लय मस्ती आली आहे. तुझ्याकडे बघतो असे म्हणत मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.यामध्ये बर्गे यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच त्यानंतर कारागृह अधीक्षक डी. जी. दुबे यांनी कार्यालयात संशयीत काशीनाथ जाधवला चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळीही त्याने बर्गे यांच्या अंगावर धावून जात धक्काबुकी करत शासकीय कामात अडथळा आणला. सातारा शहर पोलिसांनी काशीनाथ जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणणेसह विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. हवालदार दळवी हे तपास करीत आहेत.
कारागृहात बंदीकडून पोलिसाला मारहाण अन् शिवीगाळ, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 1:56 PM