औंध : ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जातोय. महाविद्यालय परिसरातील वनस्पतींचे अशा अनोख्या क्यूआर कोड पद्धतीने संकलन करुन माहिती देणारे राज्यातील हे पहिले महाविद्यालय आहे, याचा अभिमान आहे. अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवा संस्था तुमच्या पाठीशी सदैव राहील,’ अशी ग्वाही औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंत शिंदे यांनी दिली.
औंध येथील राजा श्रीपतराव महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन व श्रीमंत भगवंतराव पंतप्रतिनिधी राजेसाहेब औंध यांची २२ वी पुण्यतिथी अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे उपस्थित होते.
यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजेसाहेब विचार मंच व पदार्थ विज्ञान विभागाद्वारे विविध शास्त्रज्ञांची मॉडेल तयार करून प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी १०० विद्यार्थांना मास्कचे वाटप करण्यात आले.
रसायनशास्त्र विभागाने पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी ‘रसायनशास्त्र विषयाचे मानवी जीवनातील महत्त्व’ या विषयावर पोस्टर सादरीकरण केले.
महाविद्यालय परिसरातील व पश्चिम घाटातील व महादेव डोंगररांगांतील दुर्मीळ व औषधी वनस्पतींचे संगोपन व संवर्धन महाविद्यालय परिसरात केलेले आहे. या उपक्रमांतर्गत १६५ वनस्पतींचा डाटा बेस तयार करून त्याला क्यूआर कोड केलेले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त हणमंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एम. मोहोळकर यांनी केले तर प्रा. आर. एम. खरटमोल यांनी आभार मानले.
०४औंध
फोटो : औंध येथील महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन हणमंत शिंदे यांनी केले. यावेळी डॉ. श्रीकांत भंडारे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)