सातारा: मागील संचालक मंडळाने मांडलेला ताळेबंद तहकूब करून नवीन ताळेबंद मंजुरी देण्याबरोबरच तत्कालीन संचालक मंडळाने अनावश्यक नोकरभरती केली आहे. त्या संदर्भात संचालकांची चौकशी व्हावी, अशी एकमुखी मागणी रविवारी झालेल्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत करण्यात आली. दरम्यान, बहुतांश शिक्षक सभासदांनी या सभेकडे पाठ फिरविली.शिक्षक बँकेची वार्षिक सभा अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष मोहन निकम, संचालक शंकर जांभळे, गणेश तोडकर, राजेंद्र घोरपडे, राजकुमार जाधव, अनिल शिंदे, वैशाली जगताप, चंद्रकांत आखाडे, भगवान धायगुडे, राजाराम खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. जाधव यांच्यासह शिक्षक सभासद उपस्थित होते.रविवारी होणाऱ्या शिक्षक बँकेच्या सभेकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, माजी आमदार शिवाजीराव पाटीलप्रणीत संघाच्या संचालकांसह संघटनेने व शिक्षक समितीने या वार्षिक सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभेस शिक्षकांची उपस्थिती कमी जाणवली. सुरूवातीला बँकेचे अध्यक्ष बळवंत पाटील यांनी प्रास्ताविक करून बँकेच्या कामकाजाची माहिती दिली.यावेळी एका सभासदाने बँक संचालकांनी केवळ पहिल्याच वर्षी अभ्यासदौरा करून नंतरची चार वर्षे काम करावे, अशी सूचना मांडून संचालकांच्या अभ्यास दौऱ्याला विरोध दर्शवला. शिक्षक सभासद सतीश जाधव म्हणाले, ‘बँकेचे शिक्षक सभासदांपेक्षा बँक कर्मचाऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज वाटप का केले जात आहे. तर इतर बँकाप्रमाणे शिक्षक बँकेनेही एटीएम सेवा सुरू करावी, अशी मागणी सभासदांनी सभेत केली. यावर सहा महिन्यातच बॅकेची एटीएम सेवा सुरू होईल, अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी यावेळी दिली.नूतन संचालक मंडळाने व्याजदर कमी केल्याबद्दल तसेच वार्षिक सभेला पोलीस संरक्षणासाठी मागील संचालक मंडळाने जो ३५ हजार खर्च केला होता, तो यावर्षी वाचविल्याबद्दल नूतन संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच सभागृहात या संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. उपाध्यक्ष मोहन निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महिला सभासद अनुपस्थित --बँकेच्या वार्षिक सभेवर माजी आ. पाटील प्रणित संघ तसेच समितीने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सभेस शिक्षकांची फारशी उपस्थिती नव्हती तर सभेला महिला आघाडी अध्यक्षा व्यतिरिक्त एकही महिला सभासद उपस्थित नव्हती.
तत्कालीन संचालकांची चौकशी करावी
By admin | Published: September 20, 2015 8:48 PM