सातारा : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा चेहरा नातेवाइकांना दाखविण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी उघड केला. त्याची गांभीर्याने दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रशासनातर्फे चांगल्या सुविधा पुरविल्या जातात. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर नातेवाइकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत ‘लोकमत’ने ‘मृताचा चेहरा दाखविण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी’ या आशयाचे वृत्त दिले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, अगतिकतेमुळे लोक बोलत नव्हते. अखेर ‘लोकमत’ने दखल घेऊन सर्वसामान्यांच्या वेदना मांडल्या. ल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
‘लोकमत’च्या या वृत्ताची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून, असा प्रकार सुरू असल्याबाबत माहिती नव्हते. यापुढे असे होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कारवाईचे आदेश दिल्याचे रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.