खटाव : तालुक्यात घेवडा, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मध्ये ‘खटाव तालुक्यात घेवडा, सोयाबीन पिकावर गोगलगाईचा हल्ला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच कृषी विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शिवाराची पाहणी केली.
सध्या सर्वत्र खरिपाची पिके समाधानकारक उगवून आल्यामुळे शेतकरी सुखावला असतानाच उगवून आलेल्या कोवळ्या अंकुर तसेच असलेली पाने खाल्ल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले; परंतु नक्की कशामुळे झाले हे कळत नसल्यामुळे खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव असेल असे अनेक शेतकऱ्यांना वाटले. परंतु खटावमधील ‘चिंचेची बाग’नामक शिवारात असलेल्या शेतातील २५ ते ३० टक्के पेरणी केलेले शेतातील पीक कुरतडून खाल्ल्याचे लक्षात येताच पाहणी करता, या पिकावर गोगलगाईचे आक्रमण झाल्याचे राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आले. गोगलगाईमुळे पिकाचे नुकसान हे पहिल्यादाच दुष्काळी पट्ट्यात झाल्यामुळे कृषी विभागही अचंबित झाला असून, कृषी अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती खरी आहे का? याची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. गोगलगाईचे आक्रमणामुळे पिकांचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसणार आहेच. पीक उगवून येतानाच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. अजून यावर उपाय निघाला नसला एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनाचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल, असे कृषी सहाय्यक एच. बी. भोसले यांनी सांगितले.
०१खटाव
खटाव तालुक्यात गोगलगाईमुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करताना कृषी अधिकारी एच. बी. भोसले. समवेत शेतकरी योगेश माने, राजेंद्र भोसले, वैभव मोरे आदी.