वाई : वाई तालुक्यातील कोरोना काळजी केंद्र ,विलगीकरण कक्षांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पाहणी केली. कोरोना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आणखी काय सुविधा येथे वाढविता येतील, याठिकाणी नव्याने वाढविण्यात येणाऱ्या सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.
वाई तालुक्यात प्रशासनाने उभारलेल्या शेंदूरजणे येथील मॅप्रो कोविड रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. यावेळी रुग्णांशी व डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली. याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सुविधांबद्दल माहिती घेतली. त्यानंतर याठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पहिल्या मजल्यावरील कोविड सेंटरच्या कामाची पाहणी केली. याठिकाणी किती रुग्णांसाठी सोय वाढविण्यात येईल, याबाबत येथील प्रशासन व तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली. यामध्ये येथील औषधोपचार नियमित होत असल्याबाबतची माहिती घेतली. काही कमतरता आहे का, याचीही रुग्णांकडून त्यांनी माहिती घेतली. यानंतर येथे लहान मुलांसाठी काय व्यवस्था आहे, याचीही माहिती घेतली.
येथील कोविड सेंटर खूपच चांगले आणि अद्ययावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीने होत असल्याचे त्यांनी जाणून घेतले. यानंतर त्यांनी बावधन येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली. येथे महिलांसाठी दोन व पुरुषांसाठी तीन कक्ष उभारण्यात आले आहेत. जे रुग्ण गावांमध्ये बाधित येतील, त्यांना विलगीकरण कक्षातच दाखल करावे, यापुढे गृह अलगीकरआत कोणालाही ठेवण्यात येऊ नये, ग्रामस्थांनी आपल्याला त्रास होत असल्यास ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
गावातील परिस्थितीची त्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. यावेळी प्रशासनाच्या आदेशाविरोधात जाऊन बगाड यात्रा मिरवणूक काढल्याबद्दल गावकऱ्यांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. झाले ते झाले परंतु यापुढे सर्वांनी काळजी घ्या, असेही ते म्हणाले.
पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटल येथे नव्याने उभारलेल्या रुग्णालयाची पाहणी केली. बावधन येथे ग्रामसभेच्या सदस्यांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव, आदी उपस्थित होते.