म्हसवड : गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव दिल्यानंतर माणच्या तहसीलदारांनी स्थळ पाहणीसाठी शासकीय गाडीत बसूनच केलेला पाच मिनिटांचा सर्व्हे केवळ दिखावाच ठरला आहे. त्यामुळे याप्रश्नी माणच्या प्रशासनाला दुष्काळाचे गांभीर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आंधळी तलावातून गोंदवले बुद्र्रुकला पाणीपुरवठा होत होता; परंतु तलाव कोरडा पडल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे इतर पर्याय नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी स्वत:ची विहीर उपलब्ध करून दिल्याने यावर काही अंशी मात करता आली. याशिवाय अंगराज कट्टे यांनीही स्वखर्चातून छोटा टँकर देऊन तीव्र पाणीटंचाईच्या भागातील पाणीटंचाई कमी करण्याचा प्रयत्न केला.पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे विहीर, कूपनलिका अधिग्रहण व टँकरचा प्रस्ताव दिला होता; पण तहसीलदारांनी पाणी असलेल्या भागातील पाहणी करून गावात मुबलक पाणी असल्याचा अहवाल देऊन हा प्रस्ताव नाकारण्यात आला.त्यानंतर गावातील महिलांनी पाण्यासाठी ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याने प्रशासनाने दखल घेतली. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु तहसील कार्यालयाने हा आदेशही धुडकावून ग्रामपंचायतीला दुसरा प्रस्ताव देण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे टँकर मागणीचा नवा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानंतर तहसीलदार बी. एस. माने व गटविकास अधिकारी जी. डी. शेलार हे संबंधित अधिकाऱ्यांसह पाणीटंचाई भागाची पाहणी करण्यासाठी आले.खाली न उतरताच गाडीतूनच पाहणी करून अवघ्या पाच मिनिटांतच हा पाहणी दौरा संपवून हेअधिकारी निघून गेले. या प्रकाराने प्रशासकीय अधिकाºयांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यातयेईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
वाहनात बसूनच दुष्काळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 11:16 PM