महाबळेश्वर : मागील आठवड्यातील अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे दरडी कोसळून मोठे नुकसान झाले. या नुकसानाची गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तूरे यांनी पाहणी केली.
दरवर्षी अशाप्रकारे नुकसान होऊ नये म्हणून रस्त्यांवर आवश्यक त्याठिकाणी छोटे-छोटे पूल बांधण्याचे प्रस्ताव देण्याचे आदेश त्यांनी उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांना दिले.
मागील आठवड्यात तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील तापोळा-महाबळेश्वर, कुंभरोशी-तापोळा या दोन प्रमुख राज्यमार्गांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे साधारण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर येथील पंचायत समिती सभापती संजय गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांच्याबरोबर तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील नुकसान झालेल्या रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी शाखा अभियंता दिनेश पवार, कनिष्ठ अभियंता धुमाळ उपस्थित होते. पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी सभापती संजय गायकवाड यांनी सुचवलेला उपाय योग्य आहे. ज्याठिकाणी मोऱ्या आहेत, त्याठिकाणी छोटे-छोटे पूल बांधले पाहिजेत. यासाठी लागणारे प्रस्ताव तयार करून ते शासनाला सादर करण्याचे आदेशच महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांना दिले. तालुक्यातील विविध रस्त्यांवर आठ ते दहा ठिकाणी अशाप्रकारे लहान-लहान पूल बांधावे लागतील, अशी माहिती उपविभागीय अभियंता गोंजारी यांनी यावेळी दिली.