पाचगणी : मेटगुताड ग्रामपंचायतीने राबविलेल्या नावीन्यपूर्ण कामाची दखल घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी सुनील पार्टे, ग्रामसेवक शंकर चिकटुळ उपस्थित होते.
कामाची पाहणी करून ग्रामपंचायत राबवित असलेल्या उपक्रमशील कामांचे कौतुक करीत इतर तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी हीच प्रेरणा घेऊन वाटचाल करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वर पंचायत समितीतर्फे जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनच्या कामांचा आढावा बैठक घेण्याकरिता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे आले होते. त्यांनी विविध खात्यांची खातेप्रमुखांकडून तसेच ग्रामपंचायत पातळीवर जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन कसे राबविले जाईल याबाबत आढावा बैठक घेतली.
यामध्ये ग्रामपंचायत मेटगुताड अग्रेसर असून शंभर टक्के नळपाणीपुरवठा व मीटर जोडणी, उत्पन्नात झालेली वाढ, तसेच स्वयंचलित संयंत्रे याची माहिती आढावा बैठकीत घेतली. दुपारच्या सत्रात मेटगुताड ग्रामपंचायतीस अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्ताराधिकारी पार्टे यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने राबविलेली विविध विकास कामे, यात लिंगमळा वॉटरफॉल पाॅईंट विकसित करणे, त्याशेजारील ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर, गांडूळ खत प्रकल्प, वृक्ष लागवड या कामांची पाहणी केली.
जिल्हा परिषद शाळेजवळ स्वच्छ भारत मिशन व ग्रामपंचायतीने सुसज्ज व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या शौचालयाच्या कामाची पाहणी केली. तीन अंगणवाडी इमारती, जिल्हा परिषद निधी व ग्रामपंचायत निधी असा एकत्र करून डिजिटल अंगणवाडी इमारती जिल्ह्यातील इतर अंगणवाड्यांना दिशादर्शक ठरतील अशा प्रकारच्या बनविण्यात आल्या. या कामांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली.
त्यानंतर जुने ग्रामपंचायत कार्यालय १४ वा वित्त आयोग व ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेरे सौरऊर्जा पॅनलयुक्त केल्याने संपूर्ण कार्यालय सौरऊर्जायुक्त झाले आहे. तसेच कार्यालयात व्यासपीठ, एलईडी टीव्ही, बायोमेट्रिक थंम सिस्टिम व सर्व कामकाज ऑनलाईन तसेच पेपरलेस केले आहे.
फोटो ०१पाचगणी-मेटगुताड
पांचगणी : मेटगुताड, ता. महाबळेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे व नारायण घोलप यांनी पाहणी केली. (छाया : दिलीप पाडळे)