सातारा : जागतिक साक्षरता दिनी पहिल्यांदाच शाळेत जाऊन अक्षरे गिरवणाऱ्या ७६ वर्षीय बबई रामचंद्र म्हसकर या अशिक्षित महिलेच्या छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे. केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार अवर्णनीय व प्रेरणादायी अशा शब्दात प्रशंसा केली आहे, तर मंत्रालयाने त्यांचा फोटो ' अद्वितीय आनंद का अनुभव!' असे शीर्षक देऊन तपशीलासह ट्विट केला आहे.देशभरात मागील वर्षापासून नव भारत साक्षरता अभियान ' सर्वांसाठी शिक्षण ' या नावाने सुरू झाले आहे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिनी करण्यात आली. पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षरांच्या साक्षरतेसाठी सन २०२७ पर्यंत कालबद्ध कार्यक्रम केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने राबवणे सुरू केले आहे.
राज्यातील उपक्रमाच्या प्रारंभाची छायाचित्रे व तपशील योजना संचालनालयाने केंद्र शासनास सादर केली होती. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते या महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना पाठवले. त्यांनी ते केंद्रीय मंत्रालयाला पाठवले होते. सातारा जिल्ह्यातील ७६ वर्षीय बबई रामचंद्र म्हसकर या साक्षरता वर्गात सहभागी होऊन त्यांनी पहिल्या दिवशी काही अक्षरे व अंक गिरवले. आपणास लिहिता आल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असाच होता.