लोकमत न्यूज नेटवर्क
रामापूर : ‘पाटण शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार पाटण नगर पंचायत व ग्राम कृती समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पाटण शहरातील प्रियदर्शनी वसतिगृहात कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र असा शंभर बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहे. त्याची पाहणी नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्यासह नगरसेवकांनी केली.
गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य देण्यात यावे, यासाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाटण नगर पंचायत, ग्राम कृती समिती व नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाला शंभर टक्के हद्दपार करण्यासाठी संस्थात्मक विलगीकरणाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना याठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्या सर्व बाधितांची दैनंदिन आरोग्य तपासणीदेखील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. या विलगीकरणाला नागरिकांनी पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे व मुख्याधिकारी अभिषेक परदेेशी यांनी केले आहे. यावेळी नगसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.
फोटो अत्यावश्यक आहे.
२९पाटण-कोरोना
पाटण येथे उभारण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाची नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी पाहणी केली.