म्हसवड : राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोरोना सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असे केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सुपरस्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, या उद्देशाने देवापूर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा देवापूर येथे कोरोना रुग्णांसाठी तीस बेडच्या आयसोलेशन सेंटरची व्यवस्था केली आहे.
कोरोना वाढवणारी चेन तोडायची असेल, तर लॉकडाऊनबरोबर आयसोलेशन कोरोना सेंटरची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी. गृहविलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. त्यामुळे माण तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गृहविलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे देवापूर ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. या उद्देशाने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा देवापूर येथे कोरोना रुग्णांसाठी हे सेंटर सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अजून बेड वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती देवापूरचे सरपंच शहाजी बाबर यांनी दिली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोडलकर, पुळकोटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी सावंत, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सहायक गटविकास अधिकारी भरत चौगुले, तहसीलदार बी.एस. माने, म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे यांनी संस्थात्मक विलगीकरणासंदर्भात आढावा घेतला. यावेळी सरपंच शहाजी बाबर, उपसरपंच मंगला चव्हाण, मनीषा चव्हाण, आरोग्यसेविका साबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य, आपत्ती समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट:
चला, संसर्ग साखळी तोडू या
देवापूरमध्ये बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात राहावे, जेणेकरून इतर नागरिक बाधित होणार नाहीत. गावात निर्जंतुकीकरण, आर्सेनिक अल्बमसह रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाकाळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच शहाजी बाबर यांनी केले आहे.
===Photopath===
300521\img-20210530-wa0042.jpg
===Caption===
देवापूर ता माण येथे संस्थात्मक विलगीकरणं कक्ष सुरू..