सातारा : धोम धरणातून तीनच आवर्तने सोडण्यात येणार होती. याबाबत धूम संघर्ष समितीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी धोम धरणातून पाण्याची चार आवर्तने सोडण्याबाबतच्या सूचना सिंचन विभागाला केल्या आहेत.
कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये धोम उजव्या कालव्यातून ४ आवर्तने सोडण्याची मागणी संघर्ष समितीने केली होती, त्यावेळी ती मागणी मान्यदेखील झाली होती. पण नुकतीच एका वृत्तपत्रामध्ये जाहिरात आली आहे, त्यामध्ये मात्र आपल्याला तीनच आवर्तने दिल्याचे निदर्शनास आल्यामुळे तातडीने संघर्ष समितीने शुक्रवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी सह्याद्री कारखान्यावर त्यांची भेट घेतली व सर्व माहिती त्यांना सांगितली. यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की, त्या बैठकीचे मिनिट्स मी परत पाठवले आहेत. संघर्ष समितीची मागणी त्यामध्ये समाविष्ट करून त्याप्रमाणे आवर्तन सोडावे, त्याशिवाय मी सह्या करणार नाही तसेच लगेच सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांना फोन करून धोम धरणातून चार आवर्तने सोडण्यास सांगितले. तसेच १३ एप्रिलऐवजी ६ एप्रिलला पाणी सोडण्याचे आदेशही दिले.