कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारुख हे कोरोनासाठी संवेदनशील ठिकाण बनल्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी, कोरोना बाधितांची वाढती संख्या कमी करण्याच्या दृष्टीने तहसीलदार अमरजित वाकडे यांनी तारुख येथे भेट देऊन ग्रामस्थ, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, ग्राम समिती यांना घ्यावयाच्या काळजीबाबत सूचना दिल्या.
गत काही दिवसापूर्वी तारुख हे कोरोनासाठी संवेदनशील ठिकाण बनल्याने एकाच वेळी बाधित रुग्णांची संख्या सत्तर पार झाली होती. यावेळी तळागाळात काम करणारे सर्व कर्मचारी बाधित आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या बाधित रुग्णसंख्या २६ झाली असली तरी आज अखेर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६५ झाली आहे. चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. परिणामी अजूनही धोका कायम आहे. कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता, तहसीलदार अमरजित वाकडे यांनी तारुख येथे भेट दिली.
यावेळी कोरोना टेस्ट वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला करण्यात आल्या. याकामी ग्राम समिती, ग्रामपंचायत आणि सदस्य यांनी पुढाकार घ्यावा. लोकांनी स्वतःहून आपली काळजी घेऊन नियमांचे पालन करून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस पाटील सतीश भिसे, उपसरपंच दत्तात्रय पाटील, कोरोना समिती सदस्य सचिन कुराडे उपस्थित होते.