सातारा : एका न्यूज पोर्टलचे पत्रकार संदीप शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांचे पती राम हादगे यांच्याविरुद्ध पोलिसांत अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी दुपारी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या दालनात हा प्रकार घडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप शिंदे यांनी आपल्या विरोधात वार्तांकन करून त्याचे व्हिडिओ शूटिंग केल्याची माहिती राम हादगे यांना समजली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी शिंदे यांना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या दालनात बोलावून घेतले. शेंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हादगे यांनी व्हिडिओ शूटिंग केल्याबाबत शिंदे यांना जाब विचारला तसेच त्यांना शिवीगाळ केली.
शिंदे व हादगे यांच्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीतच होणार होते, मात्र उपनगराध्यक्षांनी मध्यस्थी केल्याने वातावरण शांत झाले. याप्रकरणी संदीप शिंदे यांनी राम हादगे यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, झालेल्या प्रकाराची सातारा पालिकेत दिवसभर चर्चा रंगली होती.
(कोट)
उपाध्यक्षांच्या दालनात आम्ही चर्चा करत होतो. यावेळी आमच्यात शाब्दिक वादावादी झाली; परंतु उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी मध्यस्थी करून सर्व वाद व गैरसमज दूर केला. झालेल्या प्रकाराबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे.
- राम हादगे