लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : सदृढ बालक असेल तर देश बलशाली बनेल, हे ध्येय घेऊन राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत महाराष्ट्राची भावी पिढी सदृढ, निरोगी व बुद्धिवान होण्यासाठी आणि राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. खंडाळा तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाने गावोगावी विविध उपक्रम राबविले. या अभिनव उपक्रमांची नोंद देशपातळीवर घेण्यात आली असून, या अभियानात खंडाळा तालुका देशात अव्वल ठरला आहे.
भारताची भावी पिढी सक्षम तयार व्हावी, यासाठी पोषण अभियानाची उद्दिष्टे निश्चित करून ते गावपातळीवर राबविण्यात आले. यामध्ये सहा वर्षे वयोगटाखालील बालकांमधील बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, सहा महिने ते पाच वर्षे वयोगटांतील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, १५ वर्षांवरील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे यांचा समावेश करण्यात आला होता.
या अनुषंगाने तालुक्यातील ६५ गावांमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले गेले. यासाठी बालकांचे पहिले १०० दिवस वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याशिवाय ॲनेमिया, अतिसार कमी करण्यावर भर देऊन हात धुणे व वैयक्तिक स्वच्छता, वैविध्यपूर्ण पौष्टिक आहार याला प्राधान्यक्रम देण्यात आले होते. ही योजना राबविण्यासाठी पोषण अभियानांतर्गत ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन, पोषण आहार बोर्ड व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या विभागांचा समन्वय करण्यात आला असून, महिला व बालविकास विभाग नोडल विभाग म्हणून कामकाज करीत आहे.
(चौकट)
पोषण अभियानाची आवश्यकता....
लोकांना पहिल्या दोन वर्षांतील बालकांच्या आहाराचे महत्त्व अद्यापही कळलेले नाही. यामुळे काही भागांत कुपोषणाची समस्या अजूनही कायम आहे. अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून
कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाल्यावस्था हा मानवाच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. गरोदरपणामध्ये महिलांना व जन्मानंतर बालकांस पहिल्या दोन वर्षांत योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दूरगामी परिणाम हे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासावर होत असतात. लहान वयात कुपोषणामुळे कमी प्रतिकारशक्ती, कमी बुद्ध्यांक, कमी शैक्षणिक प्रगती, कमी शारीरिक वाढ, संवाद कौशल्याची कमतरता असे विपरित परिणाम होऊ शकतात.
(कोट)
पोषण अभियानांतर्गत पोषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अंगणवाडी स्तरावर दरमहा समुदाय आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गरोदर महिलांना गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून मार्गदर्शन करणे, अन्नप्राशन दिवस, सुपोषण दिवस, पूर्व शालेय शिक्षणासाठी प्रवेश करणाऱ्या बालकांचा प्रवेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य काळजी घेणे असे उपक्रम राबविले जातात. यामध्ये अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच खंडाळा तालुका देशात प्रथम कमांकावर आहे.
-एम. ए. भोईटे, बालविकास प्रकल्प अधिकारी
२६खंडाळा
फोटो आहे..