गोंदवले : भौगोलिक परिस्थितीमुळे नेहमीच दुष्काळ अनुभवतोय, पाण्याअभावी शेती ओस तर परिसर भकास पडलाय, त्यामुळे जगायचं साधनही नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणाांसह लोकांना मायभूमी सोडावी लागतेय, आता बस्स झालं हे. आता आम्हीही योगदान देऊ अन् गावाचा सर्वांगीण विकास करूनच दाखवू, असा निर्धार इंजबाब, ता. माण येथील सुशिक्षित तरुणांनी घेतला आहे. या तरुणांना तितक्याच ताकदीने सहकार्य करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे.म्हसवडपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावरील उजाड माळरानावर इंजबाब गाव वसले आहे. ग्रामीण दुर्लक्षित राहिलेल्या हे गाव वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळेच २००० हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात मात्र प्रत्यक्षात ३०टक्के लोकांचेच वास्तव्य आहे. इतर सुमारे ७० टक्के लोकांना मात्र पोटासाठी स्थलांतरित व्हावे लागल्याची भीषणता आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या संतोष कापसे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. इंजबाब विकास संस्थेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. ग्रामविकासाची धडपड लक्षात घेऊन तालुका प्रशासनानेही या तरुणांना सर्व सहकार्य करण्यासाठी आता पावले उचलली आहेत. कृषी विभागाने जलसंधारणांच्या कामांसाठी पाहणी केली आहे. इंजबाबमध्ये जलयुक्त शिवार योजनेद्वारे विविध कामे तडीस नेण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी जानकर, गटविकास अधिकारी सीमा जगताप यांनीही युवकांना सहकार्य करण्यासाठी पावले उचलली आहेत. मातृभूमीच्या विकासासाठी संतोष कापसे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल कापसे, विजय धोत्रे, दत्तात्रय कापसे, केशव चव्हाण, विजय कापसे, राहुल कापसे, महादेव कापसे, सचिन कापसे आदी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)
विकासासाठी एकवटली तरुणाई
By admin | Published: February 01, 2015 12:59 AM