पिंपोडे बुद्रुक : शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या उच्च उत्पन्न वर्गातील लोकांनी स्वेच्छेने स्वस्त धान्य योजनेचा लाभ सोडावा, असे आवाहन पुरवठा विभागाच्यावतीने तालुका पुरवठा अधिकारी सुनील बोतालजी यांनी केले आहे. अपात्र लाभार्थी असूनही स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची बाजारभावाने वसुली केली जाणार असल्याची माहितीही बोतालजी यांनी दिली.
सद्यस्थितीत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वार्षिक उत्पन्न ४४ हजार रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबाना प्रति दोन रुपये किलो दराने गहू व प्रति तीन रुपये किलो दराने तांदूळ यांचे वाटप केले जाते. परंतु, या योजनेत समाविष्ट लाभार्थ्यांमध्ये बहुतांशी लाभार्थी सधन कुटुंबातील असल्याचे पुरवठा विभागाच्या निर्दशनास आल्याने शा लाभार्थ्यांनी स्वच्छेने लाभ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भूदल, वायूदल, नेव्ही, पोलीस विभाग व अन्य शासकीय-निमशासकीय, नोकरी, पेन्शनधारक, शिक्षक, प्राध्यापक, बॅंक कर्मचारी, मोठे व्यवसायिक, चारचाकी वाहनधारक, पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या व्यक्ती अपात्र लाभार्थी असून, स्वस्त धान्य दुकानदारांनी अशा उच्च उत्पन्न गट वर्गातील व्यक्तींकडून स्वयंघोषणापत्र लिहून घेण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.