अंतर्गत रस्त्यांच्या
दुरुस्तीची मागणी
सातारा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पालिकेने काही रस्त्यांचे खडी व मुरूम टाकून पॅचिंग केले होते; परंतु पावसामुळे काही दिवसांतच या रस्त्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली.
शहरातील बोगदा ते राजवाडा, राधिका चौक ते कोटेश्वर मंदिर, मंगळवार तळे मार्ग, यादोगोपाळ पेठ, बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यापूर्वी पालिकेने शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. वाहनधारकांना होणारी परवड थांबविण्यासाठी पालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.