सातारा : 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर' या असे आर्जव करत सातारा शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनाला गुरुवारी दुपारी प्रारंभ झाला. फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी अन् ढोल - ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध मिरवणुकांनी राजपथ गजबजून गेला. विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
बाप्पांची दहा दिवस मनोभावे सेवा करून भक्तीरसात नाऊन निघालेली शाहूनगरी बाप्पांच्या विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी सकाळी शहरातील काही मंडळांनी बाप्पांची पूजा-अर्चा केल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ केला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक राजपथावर येण्यास सुरुवात झाली. या मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भक्तांची रेलचेल सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य विसर्जन मार्गाला जोडणारे सर्व उपमार्ग बांबूचे बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
सातारा नगरपालिकेच्या वतीने मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी बुधवार नाका येथे महाकाय कृत्रिम तळ्याची उभारणी केली आहे. येथे विसर्जनासाठी पालिकेने क्रेनची व्यवस्था केली असून, येथे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरअभियंता दिलीप चिद्रे, अनंत प्रभुणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी विसर्जन तळ्याची पाहणी करून आढावा घेतला.
असा आहे विसर्जन मार्ग
गोलबाग, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, ५०१ पाटी ते मोती चौक, प्रतापगंज पेठ, राधिका चौक ते बुधवार नाका कृत्रिम तळे असा विसर्जनाचा मार्ग आहे.