फलटण : चिली, अमेरिका येथील हॉकी स्पर्धेत तेथील सीनिअर हॉकी संघाशी झालेल्या सामन्यात ज्युनिअर मुलींच्या भारतीय संघाने विजयश्री खेचून आणली. या राष्ट्रीय संघातील फलटणच्या तीन खेळाडूंचा फलटण तालुका क्रीडा समिती अध्यक्ष आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फलटण तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आसू येथील वैष्णवी फाळके, वाखरीची अक्षता ढेकळे ,तर कोळकीची ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती शिवरुपराजे खर्डेकर, तहसीलदार समीर यादव, राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक तथा फलटणचे प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, राष्ट्रीय हॉकी खेळाडू सचिन लाळगे, खेळाडूंचे पालक, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
वैष्णवी फाळके, अक्षता ढेकळे आणि ऋतुजा पिसाळ या विद्यार्थिनी फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून त्यांनी बालेवाडी पुणे येथील क्रीडासंकुलात हॉकीचे प्रशिक्षण घेतले. त्यांची हॉकी खेळाची प्रेरणा व प्रारंभीच्या काळातील सराव ग्रामीण भागात झाला आहे. मुलींच्या ज्युनिअर भारतीय हॉकी संघातून अमेरिकेतील हॉकी स्पर्धेसाठी गेलेल्या संघात फलटण तालुक्यातील या ३ विद्यार्थिनींचा समावेश होता. प्रथम तेथील ज्युनिअर मुलींच्या संघाचा पराभव केल्यानंतर या मुलींचा सामना तेथील वरिष्ठ संघाशी झाला. मात्र, त्या स्पर्धेतही भारतीय संघाने विजयश्री खेचून आणली आहे. त्यामुळे या संघाचे देशभर कौतुक होत असताना फलटण तालुक्यातील या ३ विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो ०२फलटण-खेळाडू
फलटण तहसील कार्यालयातील आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती शिवरुपराजे खर्डेकर, तहसीलदार समीर यादव उपस्थित होते.