शिरवळ : मौजमजा व व्यवसाय म्हणून भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या गोवा-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर थरारक कामगिरी करत मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना यश आले. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार झाला आहे. संबंधितांकडून कारसह २ लाख ८३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील अशोक उत्तमराव गाजरे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांचा मुलगा हा घरात कडी लावून दुकानांमध्ये गेला होता. यावेळी चोरट्यांनी घराची कडी काढत घरामध्ये प्रवेश केला. यावेळी कपाटामधील किमती पाच तोळे वजनाचे गंठण, पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे मिनीगंठण, अठरा हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या तीन ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे झुमके व वेल तसेच एक लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम असा ४ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड, प्रशांत वाघमारे, नितीन वाघमारे, वैभव सूर्यवंशी, अप्पा कोलवडकर यांच्या पथकाने कोणताही पुरावा नसताना तपासाचे आव्हान स्वीकारले. गोव्यावरून फिरायला मौजमजेसाठी गेलेल्या चोरट्यांची कार सापळा रचून अडविली.
कारमधील रॉनी जोसेफ फर्नांडिस ऊर्फ साहिल सलीम खान (वय ३२, रा. मालाड पश्चिम, मुंबई), अब्दुल हमीद रशीद शेख (३३), अब्दुल्ला जमीरउल्ला पठाण (३७), सुजित भगवान कांबळे (२८, तिघे रा. मानखुर्द, मुंबई) या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शिरवळ व भुईंज पोलीस ठाण्यात तीन गुन्हे केल्याचे कबुल केले. मुख्य सूत्रधार संजय रत्नेश कांबळे ऊर्फ सलीम ऊर्फ कुबड्या अब्दुल लतीफ शेख (रा. दिवा, जि. ठाणे) हा फरार असून पोलीस शोध घेत आहे. यांच्याकडून संबंधित चोरट्यांकडून कार (जीजे ०३ सीई ७३४२) सह २ लाख ८३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
त्यांना खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहे.
चौकट
गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर पहारा
भरदिवसा रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने लंपास झाल्याने व चोरटे बाहेरील राज्यातील असण्याची शक्यता गृहीत धरून शिरवळ पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान होते. यावेळी शिरवळ पोलिसांनी लीलया कौशल्याचा वापर करीत अहोरात्र सात दिवस कोणताही पुरावा नसताना मोठ्या कौशल्याने तपास करीत आंतरराज्य टोळीतील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. याकरिता शिरवळ पोलिसांनी सतत सात दिवस व गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर तीन दिवस तीन रात्र पहारा देत चोरट्यांना पकडण्यात यश मिळविले.