सातारा : ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ असा धाडसी प्रश्न एका चिमुकल्यानं विचारताच ज्येष्ठ नेते शरद पवार दिलखुलास हसले. आजूबाजूला असलेल्या डझनभर लोकप्रतिनिधींना त्यांनी हाच प्रश्न मोठ्या कौतुकानं पुन्हा एकदा ऐकविला. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पाहताना उपस्थित लोकप्रतिनिधी अवाक् बनले.बालदिनाचं औचित्य साधून ‘लोकमत’च्या विशेष पानासाठी सोमवारी साताºयातील बाळगोपाळांच्या एका टीमची थेट शरद पवारांसोबत खास मुलाखत रंगली. सांसदीय कार्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साताºयात शरद पवार यांचा सर्वपक्षीय गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री सुनील तटकरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्रपाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी शरद पवारांशी चर्चा करीत होते.अगोदरच नियोजन झाल्याप्रमाणे पाच शाळकरी मुलांचा चमू गणवेशातच विश्रामगृहात शिरला. लोकमतच्या विशेष पानावर खास मुलाखत घेण्यासाठी ही चिमुरडी थेट समोर उभी ठाकताच पवारांच्या चेहºयावर कौतुकाश्चर्याचे भाव उमटले. स्वत:हून उठून उभारत त्यांनी मुलांची विचारपूस सुरू केली. ‘लोकमत बालदिनाच्या विशेष पानात नेमकं काय-काय असणार?’ असा सवालही त्यांनी या मुलांना केला.यानंतर मुलांनी हातात वही-पेन घेऊन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. डझनभर लोकप्रतिनिधींसमोर वेगवेगळे प्रश्न विचारणाºया या चिमुकल्यांचे धाडस पाहून सारेच अवाक् झाले. ‘तुम्ही राजकारणात एवढे मोठे होणार, हे तुम्हाला बालपणी वाटले होते काय?’ या प्रश्नावर पवारांनी हसून ‘नाही’ असे उत्तर दिले. एका चिमुकलीनं ‘सुप्रियातार्इंसारखंच आम्हालाही राजकारणात यायचं असेल तर काय करायला हवं?’ असा प्रश्न विचारताच पवारांनी भुवया उंचावल्या. ‘आत्मविश्वास बाळगा. वक्तृत्व कलेचा अभ्यास करा,’ असं सांगून त्यांनी मोठ्या उत्सुकतेनं ‘हंऽऽ आता पुढचा प्रश्न?’ असं विचारत मुलांच्या उत्सुकतेचं समाधान केलं.पवारांशी संवाद साधणाºया टीममध्ये अण्णासाहेब कल्याणी माध्यमिक विद्यालयातील मानसी बागल, न्यू इंग्लिश स्कूलची जुई साळुंखे, कन्या शाळेतील श्रेया बल्लाळ, देवश्री दामले, पॅरेंटस् स्कूलचा इशांत शिंदे आणि शाहू अॅकॅडमीमधील इशान वाळिंबे यांचा समावेश होता.राजकारणात आला नसता तर काय बनला असता ?एका चिमुरड्यानं गुगली प्रश्न टाकला की, ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ ...या प्रश्नावर शरद पवार दिलखुलास हसले. त्यांनी हाच प्रश्न मोठ्या आवाजात समोरच्या सर्व लोकप्रतिनिधींना स्वत:च्या तोंडून ऐकविला. विश्रामगृहाचा हॉल हास्यकल्लोळात बुडाला. मात्र, कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचे अन् कोणता प्रश्न टाळायचा, ही पवारांची खासियत मुलांना माहीतच नसावी. प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करत मुलं जागेवरच उभारली. तेव्हा ‘छोटी असूनही तुम्ही मुलं मला सोडायला तयार नाही की... पत्रकार ते पत्रकारच!’ या अर्विभावात हसत-हसतच पवारांनी मुलाखत संपविली. त्यांच्या पाठीवर हात टाकत त्यांच्या धाडसी पत्रकारितेचं कौतुकही केलं. ‘लोकमत बालदिन’ पानाला शुभेच्छाही दिल्या.
‘लोकमत’च्या बाल पत्रकारांची रंगली शरद पवारांसोबत मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:36 AM