महाबळेश्वर : पोलिस ठाण्यात अनेकदा हेलपाटे मारूनही पोलिसांकडून चोरीचा गुन्हा उघडकीस होत नसतो. त्यामुळे बरेचजण चोरीस गेलेला ऐवज परत मिळेल, याची आशाच सोडून देतात. मात्र महाबळेश्वर येथील एका व्यक्तीने हार न मानता व पोलिसांवर विसंबून न राहता त्याने स्वत:च्या लॉजवर झालेल्या चोरीचा छडा लावला. त्यानंतर पोलिसांना सोबत घेऊन आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यास त्याने भाग पाडले. फिर्यादीच तपासी अधिकारी बनल्याची महाबळेश्वरात खुमासदार चर्चा आहे.
शंकर ढेबे (रा. लिंगमळा, महाबळेश्वर) यांनी अवकाळी येथील ‘आर्या कॉटेज’ या नावाचा लॉज चालविण्यासाठी घेतला होता. या लॉजमध्ये सहा रूम असून, या प्रत्येक रूममध्ये टीव्ही, तीन सेटअपबॉक्स होते. ढेबे यांनी त्या ठिकाणी बजीरंग म्हाडसे याला कामाला ठेवले होते. मात्र एके दिवशी अचानक म्हाडसे याने सहा टीव्ही, तीन सेटअपबॉक्स, गॅस शेगडी, सिलिंडर व २२ हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. हा प्रकार ढेबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाचगणी पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी कामगारानेच सर्व साहित्य चोरून नेल्याची लेखी स्वरुपात तक्रार केली. मात्र, पोलिसांकडून काहीच तपास होत नव्हता. त्यामुळे चोरीचा तपास लागला की नाही, याची विचारपूस करण्यासाठी ढेबे काही दिवसांनंतर पुन्हा पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी तक्रारच दाखल करून घेतली नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी अधिक चौकशी केली असता सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी उलट ढेबे यांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे केले. ढेबे तुम्ही खोटी तक्रार दिली आहे. चोरी झालीच नाही, असे आमच्या तपासात दिसून येत आहे. तुम्हीच चोरीचा बनाव केला आहे. आता तुमच्यावरच कारवाई करावी लागेल, असा दम भरला.
पोलिस अधिकारी कुलकर्णी यांनी आरोप केल्यामुळे ढेबे अस्वस्थ झाले. आपल्यावरील डाग पुसण्यासाठी त्यांनी स्वत:च छडा लावण्याचा निर्णय घेतला. ज्या कामगाराने ऐवज चोरून नेला. त्या कामगाराची सर्व माहिती काढली. कामगारासोबत उठण्या-बसण्यातल्या सर्वांची माहिती ढेबे यांनी घेतली. काही दिवस चक्क त्यांच्यावर पाळतही ठेवली. संबंधितांच्या संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर एके दिवशी त्यांच्याकडे चौकशी केली असता कामगार म्हाडसे याने एक टीव्ही अंबरनाथ (मुंबई) येथे विकल्याची पक्की बातमी ढेबेंना मिळाली.
ढेबे यांनी अंबरनाथ येथे जेथे टीव्ही विकला. तेथील पत्ताही त्यांनी शोधून काढला. त्यानंतर ढेबे यांनी पुन्हा पाचगणी पोलिस ठाणे गाठले. यावेळी मात्र, कुलकर्णी यांना न भेटता ढेबे यांनी पाचगणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांची भेट घेतली. आपण स्वत: चोरीचा तपास केला. मात्र पोलिसांनी माझी तक्रारही अद्याप घेतली नसल्याचे ढेबे यांनी त्यांना सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याचे सोनावणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकाºयांची खरडपट्टी काढत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
तब्बल दोन महिन्यानंतर अखेर चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला. आता ढेबे यांनी छडा लावलेल्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी तृप्ती सोनावणे यांनी ढेबेंसोबत पोलिस कर्मचारी पाठविले. अंबरनाथ येथून म्हाडसे या कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून तीन टीव्ही आणि तीन सेटअपबॉक्स जप्त करण्यात आले. कामगार म्हाडसेला घेऊन पोलिस पाचगणीत आले. त्यानंतरच ढेबे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पोलिसांनी आपल्यावर आरोप केल्यामुळे ढेबे बैचेन झाले होते. काहीही करून चोरीचा छडा लावायचाच, या निर्धाराने पछाडलेल्या ढेबेंनी अखेर एक दिवसासाठी का होईना पोलिस अधिकाºयाची भूमिका बजावली. त्यामुळे महाबळेश्वरसह पाचगणीमध्ये ढेबे यांच्या आगळ्या-वेगळ्या तपासाची कौतुकाने चर्चा होत आहे.