चाफळ ,दि. १ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील देवस्थानांना जोडणाऱ्या खालकरवाडी ते चाफळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला असूनही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
चाफळ येथील पर्यटन तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळालेले श्रीराम मंदिर, शिंगणवाडी येथील समर्थ स्थापित खडीचा मारुती मंदिरासह निसर्ग सौंदर्याने नटलेला सडावाघापूरचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची या रस्त्यावरून वर्दळ असते.
खालकरवाडी ते चाफळ हा साधारणत: पाच किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणि खड्डे पडले आहेत. खड्ड्यात अडकून अनेकदा अनेकांना दुखापतीही झाल्या आहेत. तर माजगाव येथील बाळकृष्ण हिमणे या तरुणाचा याच रस्त्यावर अपघात होऊन बळी गेला आहे. मात्र, तरीही बांधकाम विभाग कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाही.
सध्या या रस्त्यावरून चारचाकी वाहने चालविणेही मुश्कील झाले आहे. यातच सध्या चाफळ व परिसरातील तीर्थक्षेत्रे व निसर्गरम्य परिसराला भेट देणाऱ्या पर्यटक भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. परंतु रस्त्याची दुरवस्था पाहून काही पर्यटक देवदर्शनास येणे टाळू लागले आहेत.
तालुक्यासह जिल्ह्यातील इतर देवस्थान, तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते व त्या ठिकाणांच्या विकासाचा विचार केल्यास निश्चितच विभागासह तालुक्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याकडेला वाढलेली झाडे याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्यासाठी भरघोस निधी उपल्बध करून हा रस्ता चौपदरी करण्यासाठी प्रयत्न करावेत, मागणी होत आहे.श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जाचाफळ येथील श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर साधारण दोनवेळा येथील विकास कामासाठी निधी देऊ केला होता. त्यानंतर शासनाच्या पर्यटन खात्यामार्फत या ठिकाणच्या विकासासाठी निधीच दिला नाही.
वास्तविक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या कोणाही लोकप्रतिनिधीस साधा या तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या रस्त्यास साधा निधी मिळविता आला नाही, ही येथील शोकांतिका आहे.