वाई : पहिला व दुसरा डोस घेणारे नागरिक पहाटे सहापासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. केंद्र दहा वाजता उघडते व कोठ्याप्रमाणे नागरिकांना कुपन दिली जाते. यामुळे तासन्तास नागरिक एकमेकांच्या संपर्कात असतात. हे धोकादायक आहे. यामुळे कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.
वाई तालुक्यात एप्रिलमध्ये ३ हजार ५४२ रुग्ण सापडले. मेच्या दहा दिवसात १ हजार १४० रुग्ण सापडले. अलिकडच्या चार दिवसांत ही संख्या शंभरवर आली आहे. देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली. लसीकरणाचा पहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे २२ हजाराच्यावर लसीकरण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अभियान चालू केले आहे; परंतु कोरोना युद्धात निर्णायक ठरणाऱ्या लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन न केल्यास कोरोनावाढीचा धोका संभवतो.