वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. जवळपास सर्वच व्यवहार, बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. यामध्ये अनेक ठिकाणचे लोक परस्परांच्या नकळत संपर्कात येत असतात. पर्यटनस्थळी पर्यटकांचा वावर वाढत आहे. काही लोक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. मात्र ग्रामस्थांचा मुक्तसंचार कोरोनाला नियंत्रण देत आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणचे लोक कोणत्याही निमित्ताने इतरत्र प्रवास करीत आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, त्या ठिकाणाहून अनेक लोक जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने येत आहेत. त्यांना फक्त सुटीची मजा अनुभवायची असते. मात्र हेच लोक जर आधीपासून बाधित असतील आणि त्यांना याची कल्पनाही नसेल, तर हेच लोक आपल्या परिसरात येऊन आपल्या संपर्कात येऊन आपल्याला याची बाधा कधी पोहोचवतील हे सांगता येत नाही. लोक मुक्तसंचार करत असताना त्यांच्या नाकावर व तोंडावर मास्क परिधान करायची सवय खूप कमी लोकांना असते. यावरून एक अंदाज येतो की, किती लोक आपल्या तोंडावर व नाकावर व्यवस्थितपणे मास्क परिधान करतात.
मास्क नसलेल्या व्यक्तींवर अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही. वाई, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी नेहमीच पर्यटक येत असतात. यापैकी अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. या ठिकाणच्या व्यावसायिकांनाही या मास्कचे वावडे असल्यासारखे दिसते. मुंबई, पुणे यासारख्या कोरोना हॉट स्पॉटच्या ठिकाणाहून प्रत्येक सुटीच्या दिवशी लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. हेच लोक कोरोना पसरविण्यात कारणीभूत ठरू शकतात. लोकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर जाण्याचे टाळावे, मास्क परिधान करावा, हात स्वच्छ धुवावेत, गर्दी टाळावी यासाठी शासनाने नियमावली केली आहे, तरीही लोक या नियमावलीला केराची टोपली दाखवून आपत्ती ओढवून घेत आहेत. अशा या समाजकंटकांना धडा शिकवलाच पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
आजही अनेक लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्ये मोठ्या दिमाखात होत आहेत. यामध्ये शंभराहून अधिक लोक एकत्रित येतात. अनेक ठिकाणाहून ही मंडळी आलेली असतात. यावेळी कोणीही त्यांची तपासणी करून त्यांना सामावून घेताना दिसत नाही. हे फक्त आणि फक्त कागदावरच राहते. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव कधी कोणत्या ठिकाणी होईल याचा अंदाज लागत नाही. मुंबई, पुणे यासारख्या विविध ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील लोक वास्तव्य करीत आहेत.