पाटण : येथील एसटी आगारातील वाहतूक हळूहळू पूर्ण क्षमतेने सुरू होताना दिसत असून, या आगारात येणारे प्रवासी आणि विशेषत: विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, या सर्वांना कोरोनाचा विसर पडला की काय? असे चित्र दिसत आहे. अत्यंत दाटीवाटीने प्रवासी आणि विद्यार्थी बाकड्यावर बसत आहेत. बहुतांशजण विनामास्क वावरत आहेत. सॅनिटायझर औषधालाही दिसत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, बसस्थानकात ही परिस्थिती असताना वाहतूक नियंत्रण कक्षातून कोरोनासंदर्भात पाळावयाच्या नियमांसंदर्भात कसल्याही सूचना दिल्या जात नाहीत. केवळ एसटीची आवक-जावक ध्वनिक्षेपकावरून सांगितली जाते. त्यामुळे आगारालाच त्याचे गांभीर्य नसल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
पाटण तालुक्यातील जनतेला आणि विशेषत: विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी सोयीस्कर ठिकाण म्हणजे पाटण येथील बसस्थानक. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये सापडलेल्या या बसस्थानकातील एसटी सेवा अनेक महिने बंद होती. त्यामुळे आगाराच्या परिसरात शुकशुकाट जाणवत होता. आता मात्र जनजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे प्रवाशांनी आपली पावले बसस्थानकाकडे वळविली आहेत. त्यातच एसटी आगार व्यवस्थापनाने बहुतांश मार्गावरील एसटी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थी आगारात गर्दी करू लागले आहेत. अशातच आगार व्यवस्थापनाला कोरोना रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधक उपायांचा विसर पडला आहे. कारण सोशल डिस्टन्सिंग पाळा किंवा सॅनिटायझर उपलब्ध वापरा, याबाबत कसलीच सूचना प्रवाशांना केली जात नाही. तोंडाला मास्क लावण्याबाबत प्रवाशांकडून अनुकरण करून घेणे आणि त्यांच्याकडून पालन होते की नाही, हे पाहण्यासाठीही येथे कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.
दोन दिवसांपूर्वी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आगारात शाळा, कॉलेजमधून बाहेर पडून घराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर प्रवासीही मोठ्या संख्येने होते. एसटीची प्रतीक्षा करणारे सर्वजण एकमेकांना खेटून बसले होते. संपूर्ण आगारातील बैठक व्यवस्था फुल्ल झाली होती. असे असूनही आगारातील कर्मचारी किंवा अधिकारी कोरोनाबाबतच्या नियमांकडे गांभीर्याने पाहताना दिसले नाहीत. त्यामुळे भविष्यात पाटण आगार कोरोनाला खतपाणी घालते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
- चौकट
पाटण एसटी आगारात कोरोनाच्या अनुषंगाने पाळावयाच्या नियमाबाबत वाहतूक नियंत्रक यांना सूचना दिलेल्या आहेत. ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचना केल्या जातात. सामाजिक सुरक्षित अंतर पाळा यासंदर्भात प्रवाशांकडून अनुकरण करून घेण्यासाठी आमच्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळे अंमलबजावणी होत नाही. तरीही यापुढे दक्षता घेतली जाईल.
- नीलेश उथळे
आगारप्रमुख पाटण
फोटो : ०३केआरडी०१
कॅप्शन : पाटण येथील बसस्थानक गर्दीने फुलून जात आहे. मात्र, कोरोनाबाबत पाळावयाच्या नियमांचे गांभीर्य ना प्रवाशांना, ना बसस्थानक व्यवस्थापनाला. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.