चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना काही गावांच्या सरपंचांनी गावात जमाव गोळा करत चक्क आषाढी दिंडी सोहळे साजरे केले. याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने आयता पुरावा पोलिसांच्या हाती मिळाला आहे. याबाबत पोलीस प्रशासन कारवाई करणार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.
कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. चाफळ विभागात मंगळवारी ३८ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. एकीकडे प्रशासनाचा पोलीस व आरोग्य विभाग कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी जिवाचे रान करत आहे. दुसरीकडे चक्क काही गावांचे सरपंच विनापरवानगी जमाव गोळा करून कोरोनाला आमंत्रण देताना दिसत आहेत. मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त विभागातील काही गावांत आषाढी दिंढी सोहळे साजरे केल्याची छायाचित्रे, तसेच चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह कारवाईबाबत काय आदेश देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट :
चाफळ विभागात आषाढी दिंडी सोहळे साजरे करण्यास पोलीस प्रशासनाने कोणालाही परवानगी दिलेली नाही. ज्या कोणत्या गावाने दिंडी सोहळे साजरे केले, त्याचे फोटो व व्हिडिओ मिळाले आहेत. तपास करून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे.
-अमृत आळंदे,
पोलीस नाईक, चाफळ पोलीस दूरक्षेत्र