सातारा : जनतेवर आलेले कोरोनाचे संकट कायमस्वरूपी नामशेष करण्यासाठी आरोग्य विभाग एकवटला असतानाच या विभागाला लसीकरण केेंद्रावर मात्र, वेगवेगळे अनुभव येऊ लागलेत. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंद न करताही अनेकजण डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत आहेत. विशेषत: यामध्ये पुढाऱ्यांची लुडबुड सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळतेय. आत्तापर्यंत याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लसीकरण केंद्रावर बऱ्याचदा वादावादीचे प्रसंग घडत आहेत. वशिलेबाजी करून आपल्या कार्यकर्त्याला लस कशी मिळेल, यासाठी नतेमंडळी प्रयत्न करत आहेत. त्यातूनच मग लसीकरण केेंद्रावर दमदाटी शिविगाळीचे प्रकार घडत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा घटनानंतर दोन्हीकडून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या. सध्या हे खटले न्यायप्रविष्ट आहेत. पण हे प्रकार का घडतायत याचाही विचार होणे गरजेचे आहे. राजकीय लोकांना आपले कार्यकर्ते सांभाळावे लागतात. यासाठी पुढारी मंडळी लसीकरण केंद्रावर लुडबुड करून त्यातून राजकीय लाभ उठवताना दिसतायत. गावो गावी आता लसीकरण शिबिरे आयोजित करून आपापल्या कार्यकर्त्यांना जपले जात आहेत. यातूनच मग आरोग्य यंत्रणेवर दबाव टाकून कधी शिवीगाळ व दमदाटीचेही प्रकार घडत आहेत.
चाैकट : ही घ्या उदारणे
१) जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका पक्षाचा पदाधिकारी लसीकरण केंद्रावर दहा ते बारा कार्यकर्ते घेऊन आला. या पदाधिकाऱ्याने लसीकरणाची ऑनलाइन नाेंद केलीच नाही. शिवाय नंबरने लाइनमध्ये उभे न राहता मध्येच नंबर हवा होता. यातून मग रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले.
२) राजवाड्यावरील कस्तुरबा रुग्णालयातही वादावादीचा प्रसंग घडला. राजकीय पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून अडथळा आणल्याची तक्रार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली, तर पदाधिकाऱ्यांनीही डाॅक्टर व कर्मचाऱ्यांच्याविरोधात तक्रार दिली.
३) तिसरी घटनाही जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुसऱ्या लसीकरण केंद्रावर घडलीय. येथेही लवकर नंबर मिळावा, यासाठी दोघांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यामध्येही एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता.
कोट : लसीकरण केंद्रावरील दादागिरी कोणाचीही सहन केली जाणार नाही. जे नियमात होईल ते केले जाईल. वशिलेबाजी अजिबात चालणार नाही. लाइनमध्ये उभे राहिल्यानंतरच प्रत्येकाला लस दिली जाते. अलीकडे लसीकरणाचा वेग पूर्वीपेक्षा अधिकच वाढला आहे.
डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
चाैकट : १५ हजार डोस शिल्लक
पूर्वी लसीचा तुटवडा होता. मात्र, आता लसीचा पुरवठा जादा होऊ लागला आहे. दोन दिवसांपूर्वी एका दिवसात तब्बल १ लाख २१ हजार लसीकरण झाले. एकंदरीत लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. अनेकजणांचे पहिले डोस झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावत आहेत. सध्या १५ हजार डोस शिल्लक आहेत.
चाैकट : लसीकरण जिल्ह्यातील
१५२०४४२
पहिला डोस...
.......
दुसरा डोस
५९७४४६