कऱ्हाड : कऱ्हाडसह परिसराला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात या परिसरातील तीनशेपेक्षा अधिक सैनिक सहभागी असल्याचे दस्तावेज नुकतेच सापडले आहेत. त्यामुळे या सैनिकांचा महायुद्धातील समावेश व त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणे आता शक्य झाले असल्याची माहिती मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी दिली.येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन व मिरज इतिहास संशोधन मंडळाशी सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. कर्नल जे. पी. सत्तिगिरी, कर्नल दिनेश कुमार झा, प्रा. डॉ. सदाशिव पाटील व प्रा. सचिन बोलाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कर्नल जे. पी. सत्तिगिरी म्हणाले, इतिहासातून शिकण्याचा प्रयत्न करा. इतिहासातील आदर्श प्रतिमांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला प्रेरणा, ऊर्जा मिळेल. मात्र, इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासातील चुका विसरू नका. कारण त्या विसरला तर परत त्याच चुका होण्याची शक्यता असते. त्याबाबतीत सतर्क राहा.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांचे यावेळी भाषण झाले. प्रा. ए. बी. कणसे, ॲड. राम होगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रा. सचिन बोलाईकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. शोभा लोहार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विक्रांत सुपुगडे यांनी आभार मानले. प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. युवराज कापसे, नारायण नाईक यांनी परिश्रम घेतले. शस्त्रास्त्रांनी दिली शौर्याची साक्षप्रदर्शनात आद्यपुराश्मयुग, मोहेंजोदारो, हडप्पा, रावी, मध्यपुराश्मयुग तसेच सिंधू संस्कृतीचे पोस्टरच्या माध्यमातून तपशीलवार विवेचन दिसून आले. याशिवाय इतिहासकालीन दिनदर्शिका, शिवकालीन नाणी, जुनी चलने, शिवरायांची राजचिन्हे, मोडीतील विविध पत्रे तसेच मराठा कालीन विविध तलवारी, दुधार, युद्धफरशी, युद्धपट्टा, कट्यार, भाला, शिंगीभाला, जांबीया, फरशी आदी शस्त्रास्त्रे या प्रदर्शनात शौर्याची साक्ष देत होती.
पहिल्या महायुद्धात कऱ्हाडमधील सैनिकांचा सहभाग, महत्वाचे दस्तावेज सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 5:39 PM