भुर्इंज : ‘आय एम कृष्णा इनामदार आयपीएस आॅफिसर फ्रॉम बेंगलोर कर्नाटका’, असे म्हणतच सोमवारी मध्यरात्री दोन वाजता एक तरुणी भुर्इंज पोलीस ठाण्यात घुसली. ड्युटीवर असणार्या पोलिसांनी उभे राहून तिला अदबीने सॅल्युटही ठोकला. तिच्या सांगण्यावरुन चांदक, ता. वाई येथे वरातीमधील भांडणाबाबत भुर्इंज पोलिसांनी कारवाईही केली. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या चाणाक्षपणामुळे या तरुणीचा बनाव उघडकीस आला. संजीवनी विष्णू लाहीगुडे (वय २९, रा. बामणी कार्वे रोड विटा, जि. सांगली), असे या तरुणीचे नाव आहे. त्याचे झाले असे, टी शर्ट, जीन्स, बूट परिधान केलेली एक तरुणीने सोमवारी मध्यरात्री साहेबी मिजाशीत भुर्इंज पोलीस ठाण्यात घुसली. तिने पोलीस ठाण्यात प्रवेश करताच आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितल्याने उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी उठून तिला सॅल्यूट केला. ‘माझे नातेवाईक आनंदपूर, ता. वाई येथे राहतात. त्यांची भांडणे झाली आहेत. दोन महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचार्यांसह माझ्यासोबत भांडणाच्या ठिकाणी चला,’ अशी सूचना तिने पोलिसांना केली. दरम्यान, याचवेळी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गलांडे हे मध्यरात्री भुर्इंज पोलीस ठाण्यात याचवेळी आले होते. याबाबतची माहिती त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना फोनवरुन दिली. शेडगे तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनाही या तरुणीने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. हेमंत शेडगे हे सय्यद, महिला पोलीस सुकरे व इतर फौजफाटा घेऊन संबंधित तरुणीसोबत चांदक येथील आनंदपूर गाठले. चांदक येथील युवक अमोल हिंदुराव भिलारे रा. चांदक यांची व आनंदपूर येथील लोकांची वरातीच्या कारणावरुन भांडणे झाली होती. मात्र पोलीस पोहचण्याआधीच ती मिटविण्यात आली असल्याने पोलीस त्या तरुणीला घेऊन आल्या-पावली परत फिरले. परत येत असताना या तरुणीचा बनाव उघडकीस आला. या घटनेची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर)
तोतया ‘आयपीएस’ महिलेचा पर्दाफाश! भुर्इंज पोलिसांची कामगिरी : कारवाईसाठी तरुणीने लढविलेली शक्कल तिच्याच अंगलट
By admin | Published: May 13, 2014 11:47 PM