मायणी : ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन गावोगावी आयसोलेशन सेंटर उभी करत आहे. त्यासाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून गोळा होत असल्याने कोरोना रुग्णांवर आता गावातल्या गावातच प्राथमिक उपचार मिळत आहेत.
शहरापेक्षा ग्रामीण भागांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते आहे. प्रत्येक गावात शेकडो कोरोना बाधित रुग्ण आहेत. ग्रामीण भागामध्ये म्हणावी तशी वैद्यकीय सेवा आजही नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. शहरी भागातच यापूर्वीच कोरोनावर उपचार करणारे सर्व कोविड केअर सेंटर रुग्णांनी पूर्ण क्षमतेने भरले आहेत आणि त्यांना कित्येक दिवस बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या परिसरातील लहान-मोठ्या गावांनी व वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावांमध्ये कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांवर गावातच उपचार मिळावे, यासाठी प्रत्येक गावाच्या क्षमतेनुसार आयसोलेशन वार्ड तयार केले आहेत. यासाठी गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असलेल्या ग्रामस्थांनी नेते मंडळींनी एकत्र येऊन लोकवर्गणीच्या माध्यमातून फंड उपलब्ध करत आहेत. यातूनही आयसोलेशन सेंटर चालविण्यासाठी लागणारे बेड, गाद्या यासह प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य खरेदी करत आहेत.
यासाठी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा यासह कोरोना कमिटीतील सदस्य मोठ्या प्रमाणात पुढाकार घेताना दिसत आहेत. व्यक्तींना गावातच लगेच उपचाराची सोय होत असल्याने आज रुग्णांना मोठा आधार मिळालेला आहे. तसेच यामुळे मृत्यूदरही हळूहळू कमी होण्यास मदत मिळू लागेल.
कोट..
ग्रामीण भागात उभ्या राहत असलेल्या या आयसोलेशन सेंटरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून औषधोपचार बरोबरच कमी बाधित असलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी सतत लक्ष ठेवून आहेत. या आयसोलेशन सेंटरमुळे आरोग्य यंत्रणेवरचा थोडा ताण कमी झाला आहे.
-सुशील तुरुकमाने, वैद्यकीय अधिकारी मायणी
१६ मायणी
ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभी राहत आहे. (छाया : संदीप कुंभार)