उंब्रज : ‘कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी संस्थात्मक विलगीकरण कक्षाची उभारणी अत्यावश्यक आहे. उंब्रजचे सहयोग विलगीकरण कक्ष रुग्णांना दिलासा देणारे ठरेल,’ असे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
येथे संत निरंकारी सत्संग भवनात रोटरी क्लब, ग्रामपंचायत उंब्रज, शिवभक्त प्रतिष्ठान, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन आणि संत निरंकारी सत्संग यांच्या संयुक्त विद्यमाने पन्नास बेडचा सहयोग विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या विनिता पलंगे, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, विजय जाधव, कृष्णत माळी, डी. बी. जाधव, सोमनाथ जाधव, संग्रामसिंह पलंगे, डॉ. संजय कुंभार, डॉ. दिनेश गायकवाड, डॉ. सुनील कोडगुले, डॉ. हेमंत पाटील, अर्जुन राठोड यांच्यासह रोटरी, शिवभक्त प्रतिष्ठान आणि संत निरंकार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने होम आयसोलेशन बंद केले आहे. त्यामुळे गावागावांत संस्थात्मक विलगीकरण अत्यावश्यक असून, बहुतांशी गावांत विलगीकरण कक्षाची उभारणी सुरू झाली आहे. सहयोग विलगीकरण कक्षामुळे उंब्रजसह परिसरातील रुग्णांची सोय होण्याबरोबरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.’
प्रास्ताविक डॉ. सुनील कोडगुले यांनी केले. सरपंच योगराज जाधव यांनी आभार मानले.