आदर्की : फलटण तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पंचवीस वर्षांच्या सत्तेत धोम-बलकवडी प्रकल्प मार्गी लावून फलटण-खंडाळ्यात कालव्याद्वारे पाणी आणले. त्यामुळे घाटरस्त्याचा विकासाकडे दुर्लक्ष झाले. आता फलटण-कोरेगावला जोडणाऱ्या रेडे घाटाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
आळजापूर, ता. फलटण येथे गाव ते पवारमळा, केजळे मळा रस्ता, फडतरे वस्ती गणेश मंदिर सभा मंडप व केंजळे मळा पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समिती सदस्या प्रतिभा धुमाळ, संतकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष विलासराव नलवडे, शंकरराव नलवडे, सरपंच दिलीपराव नलवडे, उपसरपंच राजकवर नलवडे आदी उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, आळजापूर गावच्या विकासासाठी विलासराव नलवडे, शंकरराव नलवडे, तुकाराम नलवडे यांनी एकत्र येऊन दिलीपराव नलवडे यांच्या हाती सरपंच पदाची धुरा दिल्याने फलटण तालुक्यात सर्वांगीण विकासात आळजापूर पुढे राहणार आहे.
आ. दीपक चव्हाण म्हणाले, धोम बलकवडीच्या पाण्यामुळे दुष्काळी भाग हिरवागार दिसत असून, लवकरच निरा-देवधरच्या कालव्याचे पाणी धोम-बलकवडी कालव्यात सोडण्यासाठी वाघोशी पाणी सिंचन योजना मार्गी लावली जाईल. रेडे घाटाचे सर्वेक्षण झाले असून, वनविभागाच्या मंजुरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. गावच्या विकासाठी सर्वांना बरोबर घेऊन आळजापूरच्या विकासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच दिलीपराव नलवडे यांनी सांगितले.
यावेळी धैर्यशील अनपट, जयवंत केंजळे, शुभम् नलवडे, राजेंद्र नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तुकाराम नलवडे, रामदास फडतरे, विशाल झणझणे, ओंकार भोईटे, बाळासाहेब नलवडे, भाऊसाहेब नलवडे, रोहित नलवडे, सचिन मसुगडे, सतीश हिप्परकर, ग्रामसेवक आनंदराव गुरव, कौशला निंबाळकर आदी उपस्थित होते. राजेंद्र नलवडे यांनी आभार मानले.
फोटो : २० आळजापूर
आळजापूर येथे संजीवराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, धैर्यशील अनपट आदींच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)