वाठार निंबाळकर : ‘माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे बालेवाडी येथे खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुल उभे राहिले. त्याच्या माध्यमातून वाखरीसारख्या ग्रामीण भागातील मुलगी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून यशस्वी झाली, याचा आनंद वाटतो,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. नवनाथ लोखंडे यांनी केले.
वाखरीची कन्या अक्षता आबासाहेब ढेकळे पाटील ही चिली, अमेरिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारतीय संघातून सहभागी झाली होती. यात भारतीय संघ विजयी झाला. या यशाबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान बापुराव लोखंडे, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, क्रीडाशिक्षक विकास भुजबळ, जयदीप गायकवाड, दूध संघाचे संचालक श्रीरंग चव्हाण, प्रकाश नलवडे, अजित दोशी, अंगद ढेकळे, अंकुश लोखंडे उपस्थित होते.
प्रा. लोखंडे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील पालक मुलींना लहान वयात परजिल्ह्यात शिक्षणासाठी पाठविताना नकार देतात. मात्र, ढेकळे परिवाराने तिसरीत असताना मुलगी परजिल्ह्यात शिक्षणासाठी पाठविली. मुलीच्या अपार कष्टाबरोबर पालकांचा त्यागही विसरता येणार नाही. अक्षताचा आदर्श गावातील इतर विद्यार्थिनींनी घ्यावा. अक्षतामुळे वाखरीची वेगळी ओळख निर्माण झाली. वाखरीचे नाव जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र व भारतामध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्याचं काम अक्षता हिने केले आहे.’
विकास भुजबळ, अंकिता ढेकळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी ऋतुजा पिसाळ, रामभाऊ ढेकळे यांची भाषणे झाली. राजाभाऊ तांबे, संदीप शेंडगे, प्रवीण गायकवाड, बुवासाहेब गरड, दयाराम शिंदे, नितीन जाधव, प्रताप ढेकळे, दत्तात्रय मोहिते, ग्रामविकास अधिकारी प्रशांत रणपिसे यांच्यासह परिसरातील महिला ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनि, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. अजित चव्हाण यांनी स्वागत केले. मारुती मोहिते यांनी आभार मानले.
फोटो
०१वाठार निंबाळकर
वाखरी येथे झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षता ढेकळे-पाटील हिचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. नवनाथ लोखंडे, महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापुराव लोखंडे, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, विकास भुजबळ, जयदीप गायकवाड, श्रीरंग चव्हाण उपस्थित होते. (छाया : लखन नाळे)