प्रगती जाधव-पाटील
सातारा : वन्य प्राण्यांचा अधिवास जाहीर करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे हा वन कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे बिबट्या आढळल्याचे ठिकाण जाहीर करून त्याची माहिती सोशल मीडियावर काळजी घ्या म्हणून व्हिडिओ आणि फोटो टाकण्यापेक्षा वनविभागाला याची माहिती देणे शहाणपणाचे आहे. बिबट्या नरभक्षक नसल्याने त्याची भीती बाळगण्यापेक्षा त्याच्यापासून अंतर राखून निघून जाणे उत्तम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
बिबट्याच्या अधिवासात मानवाचा होणारा हस्तक्षेप, वणव्यामुळे अडचणीत आलेली वनसंपदा, शिकारीच्या मागे मानवी वस्तीपर्यंत येणाऱ्या बिबट्याला उपलब्ध होणारी मुबलक कुत्री यामुळे बिबट्याचे जिल्ह्यात विविध ठिकाणी दर्शन होत आहे. माणसांची चाहूल लागली की बिबट्याने धूम ठोकली असल्याचे बहुतांश व्हिडिओमध्ये आढळते. त्यामुळे तो आक्रमक आहे, मानवावर हल्ला करतो असे काहीच नसते. उलट कोणताही वन्यप्राणी दिसला की त्याला कॅमेऱ्यात कैद करणे आणि जवळून शूटिंग करण्याचा फालतू ट्रेंड अनेक अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहे.
वनविभागाच्या चौकशीनंतर स्टेटस डिलीट
चार दिवसांपूर्वी यवतेश्वर रस्त्याला बिबट्याची जोडी आढळून आली असून या मार्गाने जाताने काळजी घ्या, असे सांगणारे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. वनविभागाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने व्हिडिओ व्हायरल करणारे आणि स्टेटसवर तो ठेवणाऱ्यांचा शोध घेऊ लागले. पहिल्या चार जणांकडे चौकशी केल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या चौकशीला सामोरे जाण्यापेक्षा अनेकांनी स्टेटस डिलीट करून फोनही बंद केले.
शिकाऱ्यांना मिळतेय आयती माहिती
बिबट्या हा शेड्यूल १ मधील वन्यप्राणी आहे. त्यामुळे त्याला वन कायद्यात संरक्षण मिळाले आहे. बिबट्याची कातडी, नखे आणि दात यांच्या तस्करीत लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे त्यांना संरक्षित करण्यात आले आहे. बिबट्यांचे वावर क्षेत्र ठरलेले असले तरीही त्याची माहिती जाहीर करणे, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे या सर्व गोष्टी वन कायद्याने गुन्हा आहेत. बिबट्याचा अधिवास जाहीर केल्याने त्यांच्या अवयवांची तस्करी करणारे शिकारी त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकत असल्याने त्यांची माहिती सार्वत्रिक होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे.
बिबट्या नरभक्षक नाही; पण त्याला त्याच्या उंचीपेक्षा कमी कोणी दिसले तर आणि असुरक्षित वाटले तरच तो हल्ला करतो. बिबट्याच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप झाल्याने त्याचे दर्शन होते. नागरिकांनी कोणताही वन्यप्राणी दिसल्यानंतर वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून याची माहिती द्यावी. - डॉ. निवृत्ती चव्हाण, वनक्षेत्रपाल, सातारा