कुडाळ : ‘कोयना धरण निर्मितीत जमीन गमावली आहे. त्यावर खालच्या भागातील शेतकरी सधन झाले आहेत. तुमचा त्याग मोठा आहे. आपल्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटात मदतीचा हात देणे हे समाजाचे कर्तव्यच आहे,’ असे प्रतिपादन बंडातात्या कऱ्हाडकर यांनी केले.
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्यावतीने कोयना विभागातील येरणे, देवसरे, सोनाटसह अकरा गावांतील आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत सौंदरी येथे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विलासबाबा जवळ, बाबूराव सपकाळ, धोंडिराम महाराज सपकाळ, अशोक महाराज, आनंद जाधव, नंदू जगताप, बाळासाहेब शेरेकर, माउली यादव उपस्थित होते.
बंडातात्या म्हणाले, ‘व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावागावात धान्य जमा केले आहे. यामध्ये शेरे, शिरावडे, कोपर्डे हवेली (कराड), सोळशी ( कोरेगाव), सोनगाव ( सातारा), शिंदेवाडी ( माळशिरस) या गावांनी दिलेले ६५०० किलो धान्याचे वाटप करत आहोत. आमचा कार्यकर्ता सामान्य व शेतकरी कुटुंबातील असला तरी त्यांच्याकडे देण्याची दानत आहे.’
यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष शहाजी काळे यांनी अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालेलं एक गाव पूर्णपणे उभे करण्याची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. बाळकृष्ण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग जाधव यांनी आभार मानले.