सातारा : काॅलेजवरून घरी परतणाऱ्या युवतीचा विनयभंग करून मोबाईल हिसकावून घेऊन पलायन करणाऱ्या युवकाला सातारा शहर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. उमेश नवनाथ पवार (वय २२, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. सोनजाइनगर वाई) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील एका काॅलेजमधून दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास एक युवती घरी जात होती. त्यावेळी एक युवक पाठीमागून आला. त्याने त्या युवतीचा विनयभंग करून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पलायन केले. या प्रकारामुळे संबंधित युवती भयभीत झाली होती. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात युवकावर विनयभंग आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना संबंधित आरोपी उमेश पवार हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी पुणे येथे गेले. त्यावेळी तो एका ठिकाणी काम करत असताना पोलिसांना सापडला. त्याला अटक करून साताऱ्यात आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने आदींनी या कारवाईत भाग घेतला.
युवतीचा विनयभंग करून दोन महिने होता पसार, संशयित युवकाला पुण्यात केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 5:21 PM