सातारा : लोकसभा निवडणुकांच्या लढती अत्यंत अटीतटीच्या होतात. त्यामुळे काही उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार व मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार करतात. लोकसभा निवडणुकीत अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग आहे, असे अघोरी प्रकार करणाऱ्यावर पोलिस प्रशासनाने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
निवडणूक काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा अनेक तक्रारी येतात. निवडणूक काळात कोठे मतदारांवर दबाव टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा असे आवाहन अंनिसच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, दीपक माने, भगवान रणदिवे, शंकर कणसे, हौसेराव धुमाळ, सुकुमार मंडपे, प्रमोदिनी मंडपे यांनी केले आहे.
मतदारांच्या मनात अंधश्रद्धेची भीती निर्माण करणाऱ्या या प्रकारांमध्ये नारळावर हात ठेवून विशिष्ट व्यक्तीला मत देण्याची शपथ घ्यायला लावणे, देवाचा भंडारा- अंगारा उचलून मत देण्याविषयी शपथ घ्यायला लावणे, जवळच्या प्रसिद्ध देवस्थानावर मतदारांना घेऊन जाऊन पुजाऱ्याकडून शपथ घ्यायला लावणे, मांत्रिक- तांत्रिकांना गावामध्ये बोलावून महिला मतदारांवर दबाव निर्माण करणे, धर्मगुरूंना बोलावून मतदारांच्यावर प्रभाव टाकणे, विरोधी उमेदवाराच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू मिरची, नारळ याचा उतारा टाकणे. विरोधी उमेदवारावर तथाकथित काळी जादू-करणीचा प्रकार करणे असे निखळ अंधश्रद्धेचे अनेक प्रकार सध्या निवडणूक काळात घडत आहेत.
मतदारांवर दबाव टाकण्यासाठी अंधश्रध्देची भीती भरविण्याचे प्रकार हे आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार देखील असे प्रकार करून दहशत निर्माण करणे हा गुन्हा आहे. असे कोणा उमेदवाराकडून होत असेल तर त्यांच्यावर चाप बसवून आदर्श आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे. - डाॅ. हमीद दाभोळकर, अंनिस