सातारा : सातारा शहरासह परिसरात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाटात पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाडा कमी झाला. तर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस झाला होता. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली होती. या गारपीटमुळे अधिक करून फळबागा तसेच टोमॅटो आणि कांद्याचे नुकसान झाले होते. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा वळवाचा पाऊस बरसू लागला आहे. पहिल्या दिवशी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सातारा शहरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास जवळपास २० मिनिटे पाऊस झाला होता. तसेच गाराही पडल्या होत्या. या पावसामुळे अंधारून आले होते. तर फलटण, वाई आणि कोरेगाव तालुक्यातही पाऊस आणि गारपीट झाली. या पावसामुळे गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला होता.
मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सातारा शहराबरोबरच परिसरात वळवाचा पाऊस पडला. दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरवात झाली. मात्र, पावसात जोर नव्हता. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाला होता. तसेच अंधारून आले होते. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते.
फोटो दिनांक २७ सातारा रेन फोटो...
फोटो ओळ : सातारा शहरात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस पडला. यामुळे रस्ता निर्मनुष्य दिसत होता. (छाया : नितीन काळेल)